Maharashtra Politics live : बँकामधील सर्व व्यवहार मराठीतून होत आहेत की नाही, मनसेकडून पाहणी
Sarkarnama April 01, 2025 03:45 PM
Nagpur live: काँग्रेसला मोठा धक्का: 12 नगरसेवक भाजपात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या 12 नगरसेवकांचा यात सहभाग आहे. कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा झाला.

MNS Live: अविनाश जाधव हे मनसैनिकांसह बँकेत पोहचले

Thane: बँकामधील सर्व व्यवहार मराठीतून होत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी ठाण्यातील मनसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. मनसे नेते अविनाश जाधव हे मनसैनिकांसह बँकेत पोहचले आहेत. बँकांमध्ये जाऊन कर्मचारी हे मराठी कारभार होत आहे की याची तपासणी ते करीत आहेत.

RBI NEWS: भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण, राष्ट्रपतींची उपस्थिती, आज कार्यक्रम

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समारंभ सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. एनसीपीए, नरिमन पॉईंट, मुंबई, येथे हा सोहळा होणार आहे.

Karmala News: माजी आमदार जयवंतराव जगताप पुत्रावर गुन्हा दाखल

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या अक्षय शिंदे, गणेश गायकवाड यांच्यावर महसूल विभागाचे पथकाने कारवाई करताना वाळू चोरी करणाऱ्यांना वाहनासह पळवून लावल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणाने पोलिसांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस स्टेशनमध्ये शंभूराजे जगताप,अक्षय शिंदे गणेश गायकवाड इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयवंतराव जगताप हे करमाळ्याचे माजी आमदार आहेत.

कराडला आर्थर रोड जेलमध्ये टाका : दमानियांची मागणी

वाल्मिक कराडला मुंबई मध्यवर्ती कारागृहात अर्थात आर्थर रोड जेलमध्ये टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. कराडला कारागृहात झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी ही मागणी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज

आजपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शुन्यावर आले आहे. 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य झाल्यानंतर आज नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. आवक वाढल्याने मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. मात्र आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर आल्यानं कांदा निर्यात वाढण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातीला चालना मिळाल्यास कांद्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता

शिवद्रोही प्रशांत कोरटकर सुटणार?

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बचाव पक्षाच्या वतीने कोरटकरच्या जामिनासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात अपिल केले आहे.

नागपूर दंगलीतील प्रमुख आरोपीला जेल की बेल?

नागपूर हिंसाचार घटनेतील कथित सूत्रधार फहिम खान यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. फहिम खानला 11 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण पोलिसांना कधीही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखीव ठेवण्यात आली आहेत.

फहिम खान याच्यावर गणेशपेठ, तहसील आणि सायबर या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्येही त्याला अटक होऊ शकते. कोर्टाच्या आदेशावरून इतर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस कोठडी घेऊ शकतात.

राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ

महाराष्ट्रात घर आणि मालमत्ता खरेदी करणे आणखी महागणार आहे. राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सुमारे साडे चार टक्के वाढ केली आहे. आज म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.