Shreyas Iyer : श्रेयस अय्यरसाठी गूड न्यूज, आयपीएल 18 व्या मोसमादरम्यान मिळणार 5 कोटी रुपये!
GH News April 01, 2025 11:08 PM

श्रेयस अय्यर सध्या आयपीएलच्या 18 व्या मोसमात खेळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या श्रेयस अय्यरकडे आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. श्रेयसचं नशीब सध्या जोरात आहे. पंजाब किंग्सने मेगा ऑक्शनमध्ये श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली. त्यानंतर श्रेयसने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर आता श्रेयसला गूड न्यूज मिळणार आहे. श्रेयसचा बीसीसीआयकडून वार्षिक करारात समावेश करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

श्रेयसला गेल्या वर्षी बीसीसीआयने वार्षिक करारातून डच्चू दिला होता. मात्र यंदा श्रेयसला प्रमोशन मिळणार आहे. श्रेयसचा वार्षिक करारात ए ग्रेडमधील खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो. श्रेयसला ए ग्रेडनुसार वार्षिक करार मिळाल्यास त्याला बीसीसीआयकडून 5 कोटी रुपये मिळतील. श्रेयसने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसला याच कामगिरीचं बीसीसीआय बक्षिस देऊ शकते.

ईशान किशनला झटका!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन याचा यंदाही वार्षिक करारात समावेश करण्यात येणार नाही. ईशानने गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहेत. तसेच ईशानने आयपीएलमधील 18 व्या मोसमात खणखणीत शतक झळकावलंय. मात्र त्यानंतरही ईशानला वार्षिक करारात संधी मिळणार नसल्याचं निश्चित आहे. नियमांनुसार, वार्षिक करारात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूला एका वर्षात 3 कसोटी, 8 एकदिवसीय किंवा 10 टी 20i सामने खेळणं बंधनकारक असतं.

अक्षर पटेलला प्रमोशन!

तसेच टीम इंडियाचा ऑलराउंडर अक्षर पटेल याला वार्षिक करारात पदोन्नती मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियाने 9 महिन्यांत टी 20i वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. या दोन्ही स्पर्धेत अक्षर पटेलने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे अक्षर पटेलला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार आणि अभिषेक शर्मा या त्रिकुटालाही पहिल्यांदा वार्षिक करारात संधी मिळू शकते. त्यामुळे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं बीसीसीआय या वार्षिक कराराची केव्हा घोषणा करते? याकडे लक्ष लागून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.