बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड
esakal April 02, 2025 11:45 AM

- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड

बुद्धिमत्ता, शिस्त, विविध कौशल्ये यांना अथक परिश्रम आणि सुसंगतेची जोडी मिळाली तर अशक्यप्राय गोष्टी ही सहज शक्य होतात. परिश्रमाला पर्याय नाही, कुठे आणि किती मेहनत घ्यावी हे कळणे महत्त्वाचे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे सगळे करताना आपले लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

आपण आधी वयाने आणि नंतर कर्तृत्वाने मोठे होत जातो. नवनवीन लोभ, आमिषे, आकर्षण वाढत जातात. कधी पैशांचे, कधी व्यसनांचे तरी कधी भावनांचे. हे आपण टाळू शकत नाहीत, त्यामुळे टाळण्यापेक्षा त्यापासून स्वतःला वाचवून आपल्या लक्षावर मन केंद्रित करून आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे. हे कसे साधावे? थोडी शिस्त, थोडा अभ्यास आणि आपली जडणघडण.

आयुष्यात काय गाठायचे आहे याचे वेळोवेळी भान ठेवले पाहिजे. हे सर्व जुळून आणण्याची जबाबदारी आपली आहे. हे सगळे करताना, परिश्रम म्हटले की संघर्ष आलाच, तो कुणालाच टळलेला नाही. मराठीत एक म्हण आहे, ‘टाकीचे घाव सोशल्याशिवाय देवपण येत नाही.’ हरिवंशराय बच्चन यांची एक सुंदर कविता आहे...

संघर्ष ही जीवन है

जब तक जीवन है

तब तक संघर्ष है

जेवढ्या लवकर आपण हे स्वीकारू तेवढ्या सहजतेने पुढील प्रवास आणि त्यासाठी लागणारे परिश्रम सोपे आणि सरळ होईल. तुमची आकलनशक्ती कितीही चांगली असली तरीही अभ्यास म्हणजे वाचन, लिखाण आणि त्याचा वारंवार सराव करणे तितकेच आवश्यक आहे.

तुम्ही व्यावसायिक, उद्योगपती असाल किंवा नोकरदार असाल, करिअरच्या सुरुवातीच्या काळात जेवढे अधिक परिश्रम घ्याल, कामात लक्ष द्याल तेवढे पुढे काम सोपस्कार होईल. एडिसनने ‘लाइट बल्ब’चा शोध अपघाताने लावला असे म्हणतात, परंतु तो लावण्यासाठी अथक परिश्रम आणि कित्येक प्रयोग करतच होता.

शेवटी त्याला एक दिवशी अचानक त्याचे फळ मिळाले. तुम्ही आपल्या समोर लक्ष ठेवून मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्याला छोट्या टप्प्यात वाटून, व्यवस्थित नियोजन करून परिश्रम आणि कष्ट केल्यास करिअर यशस्वी होणारच.

आपले लक्ष निश्चित करणे, नको त्या गोष्टी बाजूला सारून, नियोजन करून, अवश्य कौशल्ये विकसित करणे, त्यांचे प्राधान्य ठरवणे आणि त्याच्या जोडीला तुमचे अथक परिश्रम आणि प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

कुठलेही स्मारक, मोठ मोठी संस्था किंवा कंपनी, व्यक्तिमत्त्व घडायला वेळ लागतो आणि तेवढा संयम आपण ठेवला पाहिजे. करिअर हे टी-२० नाही तर कसोटी क्रिकेट आहे, लांब खेळी खेळणे, टिकून राहणे आणि संधी मिळाल्यावर त्याचे सोने करावे. हे सर्व आपल्याला यशस्वी करण्यात मदत करतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.