- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
गिग इकॉनॉमी म्हणजेच अल्पकालीन आणि लवचिक कामाच्या संधींवर आधारित अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेने नोकरीच्या पारंपरिक संकल्पनेला नवा आयाम दिला आहे. फ्रीलान्सिंग, प्रोजेक्ट बेस्ड वर्क, आणि ऑन-डिमांड जॉब्स या स्वरूपात गिग इकॉनॉमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. गिग करणे हे सुरुवातीला एकदम कूल वाटू शकते, की मी कुणाचा नोकर नाही, कामाची नेमकी वेळ नाही, मला हवं तेव्हा मी काम करू शकतो, कुणाला विचारायची गरज नाही इत्यादी. मात्र, या सगळ्या फसव्या गोष्टी आहेत. गिग केली तरी जिथे गिग कराल तिथे कुणीतरी बॉस असणारच, ते कामाबद्दल विचारणारच!
फ्रीलान्सिंग
फ्रीलान्सिंग हे गिग इकॉनॉमीतील सर्वांत लोकप्रिय क्षेत्र आहे. लेखन, ग्राफिक डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट यांसारख्या कामांमध्ये विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंगद्वारे उत्पन्न मिळवता येते. अपवर्क, फीवर आणि फ्रीलान्सर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी त्यांची कौशल्ये विकू शकतात.
ऑनलाइन शिकवणी
शिक्षण क्षेत्रातही गिग इकॉनॉमीची मोठी भूमिका आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विशिष्ट विषयांमध्ये ऑनलाइन शिकवणीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते. अनेक प्लॅटफॉर्म्सवर विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत.
डिलिव्हरी आणि ऑन-डिमांड जॉब्स
स्विगी, झोमॅटो आणि उबर यांसारख्या कंपन्या विद्यार्थ्यांसाठी पार्ट-टाइम कामाच्या संधी उपलब्ध करतात. या नोकऱ्या वेळेनुसार लवचिक असतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि काम यांचा समतोल राखता येतो.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसिंग
सध्याच्या डिजिटल युगात कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसिंग हे करिअरचे महत्त्वाचे क्षेत्र ठरले आहे. यू-ट्यूब, इन्स्टाग्राम आणि टीक-टॉक यासारख्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट तयार करून उत्पन्न मिळवता येते. आपले स्वतःचे लेखन असल्याची मात्र नीट खात्री करायला विसरू नका.
डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना गिग इकॉनॉमीद्वारे उत्तम संधी मिळतात. योग्य प्रशिक्षण आणि कौशल्याने या क्षेत्रात यशस्वी होणे शक्य आहे.
प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञान आधारित प्रकल्प
प्रोग्रॅमिंग आणि डेव्हलपमेंटमध्ये गती असलेल्या विद्यार्थ्यांना गिग इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट्स मिळतात. अॅप डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, आणि डेटा ॲनालिटिक्स या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले अनुभव मिळतो.
निष्कर्ष -
गिग इकॉनॉमी विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकसित करण्याचे आणि स्वतंत्र उत्पन्न मिळवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. हे क्षेत्र लवचिक असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कामाचे व्यवस्थापन सहज करता येते. गिग इकॉनॉमीच्या माध्यमातून तुमची कौशल्ये विकसित करा आणि यशस्वी करिअर घडवा!