लाडक्या उद्योजकांना रेड कार्पेट मिळाले, लाडक्या बहिणींनाही दरमहा दीड हजाराची ओवाळणी मिळाली, पण आमच्या लाडक्या ट्रकचालक बांधवांना काहीही मिळाले नाही. हेच बांधव आज दिवसरात्र वाहतूक करुन मालाची नेआण करुन महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत आहेत. ट्रक-टेम्पोचालक नसते तर लाडक्या शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल लाडक्या ग्राहकांपर्यंत कसा बरे पोहोचला असता?
म्हणून तात्काळ प्रभावाने ट्रक-टेम्पोचालकांना समृध्दी महामार्गासहित सर्व मार्गांवरील टोल सरसकट माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे मालाचे भावही उतरतील, आणि लाडक्या ग्राहकराजाला एरवी ऐंशी रुपये किलोने मिळणारा टोमॅटो अवघ्या वीस रुपये अडीच किलो भावाने उपलब्ध होतील.
शेतमाल स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांना कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी फुकट देण्याचा निर्णयही भाजीपाला विक्री संघटनेने घेतला आहे. लागेल तितकी कोथिंबीर फुकट या कल्पनेने काही लोकांना झीट येईल, आणि त्यांना कांदा हुंगवावा लागेल, हे ओळखून येते तीन महिने कांद्याचा भावही पाच रु किलो इतका माफक ठेवण्यात येणार आहे.
मूर्च्छा आलेल्यास जागे करण्याच्या कामी चप्पलही उपयुक्त ठरते, हे ओळखून चप्पलबुटाच्या विक्रेत्यांनी तात्काळ पन्नास ते नव्वद टक्के सूट जाहीर केली आहे.
एकंदरित प्रचंड स्वस्ताईचा काळ सुरु होत आहे!
अनेकांना घरे पर्वडत नाहीत. आपल्या मराठी माणसांना घरे पर्वडत नाहीत, या जाणीवेने मायबाप सरकारच्या काळजाला घरे पडली. शेवटी प्रधानमंत्री नांदा सौख्यभरे योजनेअंतर्गत प्रत्येकास हक्काचे घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर या हक्काच्या घरास २०४७ सालापर्यंत मेन्टेनन्स चार्ज, तसेच पाणीपट्टी व वीज बिल माफ असेल, असे कळते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे हुरुप येऊन अनेक पालकांनी आपापली इंग्रजी माध्यमातील मुलामुलींचे नावे काढून घेऊन मराठी शाळांमध्ये घालण्याचा सपाटा लावला आहे. ‘इंग्लिशला मेलं काय सोनं लागलंय?’ अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया एका मम्मा, तीन पप्पा आणि सात डॅडलोकांनी व्यक्त केली.
एका विद्यार्थ्याला ‘तू मोठेपणी कोण होणार?’ असे विचारताच तो बाणेदारपणाने उत्तरला की, ‘मी मराठी माध्यमातून वैद्यकशिक्षण घेऊन डॉक्टर नव्हे, तर वैद्यकतज्ञ होणाराय!’ हे ऐकून बरेच लोक नाक मुठीत धरुन डॉक्टरकडे पळाले असे कळते.
आधीच सरकारवर खूप बोजा असल्याने व अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेबांचा चेहरा रोज पडत चालल्याने दया येऊन शेतकऱ्यांनी ‘औंदा कर्जमाफी नको, दादा’ असे स्वत:हून सांगण्यासाठी आंदोलनाची तयारी केल्याचे कळते. याउलट कर्जमाफी घ्यावीच लागेल, अशी कठोर भूमिका सरकारने घेतली आहे. जो शेतकरी कर्जमाफी नाकारील, त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे असे कळते.
तथापि, यापुढे वाट्टेल तिथे (किंवा सांगतील तिथे) रेड मारण्याचे धोरण कायमचे त्यागण्याची शपथ ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पहाटे उठून कोणाच्याही घरी जाऊन कपाटातले कागद उपसण्याचा अगदी कंटाळा आला असून यापुढे संशयित गुन्हेगारांना ‘प्लीज कॉल बॅक इफ पॉसिबल’ एवढाच मेसेज पाठवण्याचा निर्णय तपास यंत्रणांनी घेतला आहे.
विश्वप्रवक्ते संजय राऊत हे सकाळी सव्वानऊ वाजता टीव्ही वाहिन्यांवरुन योगासने करुन दाखवणार आहेत. यापुढे विश्वात शांततेचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरवल्याचे समजते.
एक एप्रिलच्या शुभमुहूर्तावर वरील शुभवर्तमान कळल्यावर एक जण म्हणाला की-
हमको मालूम है जन्नत की हकिकत लेकिन
दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है…