एमएचटी-सीईटी - यशाकडे पाऊल
esakal April 02, 2025 12:45 PM

- रिना भुतडा, करिअर समुपदेशक

‘एमएचटी-सीईटी’ ही अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी आवश्यक आणि महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (स्टेट बोर्ड) अभ्यासक्रमावर आधारित असून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांतील ज्ञान तपासते. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये, सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय व खासगी विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी ‘एमएचटी-सीईटी’ हे प्रवेशद्वार आहे.

एमएचटी-सीईटी आणि जेईई

जेईई आणि एमएचटी-सीईटी या दोन्ही परीक्षा तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचे स्वरूप भिन्न आहे. जेईईमध्ये संकल्पनात्मक आणि अनुप्रयोगाधारित प्रश्न असतात, तर ‘एमएचटी-सीईटी’मध्ये वेग आणि अचूकता, वेळेचे व्यवस्थापन याला अधिक महत्त्व असते. महाराष्ट्रातील ८५ टक्के अभियांत्रिकीच्या जागा ‘एमएचटी-सीईटी’द्वारे आणि उर्वरित १५ टक्के जेईई (मेन) द्वारे भरल्या जातात. जेईईद्वारे खुल्या प्रवर्गासाठी ‘आयआयटी’ किंवा ‘एनआयटी’मध्ये प्रवेशासाठी बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण आवश्यक असतात, तर ‘एमएचटी-सीईटी’साठी हा निकष ४५ टक्के आहे.

स्पर्धेची तीव्रता आणि तथ्ये

‘एमएचटी-सीईटी’ ही स्पर्धात्मक परीक्षा आहे. परीक्षेत एकूण १५० बहुपर्यायी प्रश्न असतात. भौतिकशास्त्र (५०), रसायनशास्त्र (५०) आणि गणित/जीवशास्त्र (५०) ज्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. प्रश्नांचे वजन अकरावीच्या अभ्यासक्रमावर २० टक्के आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर ८० टक्के असते. ‘एमएचटी-सीईटी’ राज्यस्तरीय स्पर्धात्मक परीक्षा आहे. ‘जेईई’मध्ये संकल्पनात्मक आणि ॲप्लिकेशन आधारित प्रश्न असतात.

‘एमएचटी-सीईटी’बद्दलचे गैरसमज

‘जेईई’ची तयारी केल्यास ‘सीईटी’चा अभ्यास आपोआप होतो - दोन्ही परीक्षांच्या काठिण्य पातळी, परीक्षेचा पॅटर्न, ‘जेईई’मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणे, युनिट्सची संख्या वेगवेगळी आहे.

- ‘एमएचटी-सीइटी’चा अभ्यासक्रम बोर्ड परीक्षांपेक्षा वेगळा आहे - ‘एमएचटी-सीईटी’ हा महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

- फक्त मागील वर्षांचे पेपर सोडवणे पुरेसे आहे - ते उपयुक्त असले तरी, जास्तीत जास्त मॉक टेस्ट आणि सखोल सराव गरजेचा आहे.

तयारीसाठी महत्त्वाचे स्रोत

  • ६०-७० प्रश्न - पाठ्यपुस्तकावर आधारित

  • १५-२० प्रश्न - ‘एनसीईआरटी’वर आधारित

  • १०-१५ प्रश्न - नमुन्यांवर आधारित

प्रभावी तयारीचे उपाय

  • योजनाबद्ध अभ्यास - महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्या आणि नियमित सराव करा.

  • मॉक टेस्टचा सराव - वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी दर आठवड्याला सराव परीक्षा द्या. सीईटी सेलच्या वेबसाइटवर सीईटी-अटल मॉक टेस्ट सरावासाठी उपलब्ध आहेत.

  • संकल्पना स्पष्ट करा - पाठ्यपुस्तकांबरोबरच ‘एनसीईआरटी’ आणि नमुना प्रश्नांचा वापर करा.

  • वेग आणि अचूकता वाढवा - सूत्रे पाठ करा आणि जलद व अचूक प्रश्न सोडवण्याचा सराव करा.

  • पूर्ण लांबीची प्रश्नपत्रिका सोडवा - वेळ निश्चित करून पूर्ण लांबीची प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे.

निष्कर्ष -

‘एमएचटी-सीईटी’ ही स्पर्धात्मक परीक्षा असली तरी योग्य रणनीतीने ती सहज साध्य करता येऊ शकते. गैरसमज दूर करून, योग्य तथ्ये समजून घेऊन आणि प्रभावी तयारीद्वारे विद्यार्थी या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.