जमीन-जागा मोजणीसाठी ८ ते १२ हजार रुपयांचे शुल्क! शेजारील शेतकरी मोजणीसाठी विरोध करत असेल तर पर्याय काय?, वाचा...
esakal April 02, 2025 02:45 PM

सोलापूर : जमीन मोजणीसाठी द्रुतगती व नियमित असे दोनच प्रकार आहेत. द्रुतगती मोजणी ३० दिवसांत तर नियमित मोजणी ६० दिवसांत करावी, असे अपेक्षित आहे. बांध टोकरणे, जमिनीत अतिक्रमण, वहिवाटीचा वाद अशा कारणांतून सध्या सोलापूर जिल्ह्यातील सरासरी ७५० शेतकरी दरमहा जमीन मोजणीसाठी अर्ज करत आहेत. त्यातील सुमारे १५० जण तहसीलदारांच्या आदेशावरून पैसे भरून पोलिस बंदोबस्त देखील घेतात, अशी स्थिती आहे.

जमिनीची द्रुतगती मोजणी करण्यासाठी दोन हेक्टरसाठी आठ हजार रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी चार हजार रुपये शुल्क आहे. नियमित मोजणीसाठी दोन हेक्टरसाठी दोन हजार रुपयांचे शुल्क असून पुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी एक हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. महापालिका-नगरपालिका हद्दीतील एक हेक्टर जमिनीच्या नियमित मोजणीसाठी तीन हजार तर द्रुतगतीसाठी १२ हजार रुपयांचे शुल्क आहे.

दरम्यान, जमिनीच्या वादातून सध्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये दरमहा सरासरी ६० ते ७० गुन्हे दाखल होत आहेत. भावकीतील शेजारील शेतकऱ्याची बांधावरून होणारी कटकट कायमची थांबावी म्हणून आता शेतकरी आपापल्या गटाची मोजणी करून घेत आहेत. पण, शेजारील शेतकऱ्याकडे काही गुंठे जमीन निघत असल्यास ती काढून संबंधित शेतकऱ्याला परत देण्याचा अधिकार भूमिअभिलेख विभागाला नाही. त्यामुळे जमिनीची मोजणी करूनही त्या शेतकऱ्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावाच लागतो.

शेजारचा सहमती देत नसेल तर काय?

स्वत:च्या गटाची मोजणी करताना शेजारील शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात नोटिसा दिल्या जातात. पण, जमीन मोजणाऱ्याचा गट स्वतंत्र असेल तर शेजारील शेतकऱ्याच्या सहमतीची आवश्यकता नसते. मात्र, त्याच गटाचे हिस्से झाले असतील आणि एका पोटहिश्श्याची मोजणी करायची असल्यास शेजारच्याची सहमती लागतेच. पोटहिश्शातील शेतकरी विरोध करीत असल्यास मोजणी करता येत नाही. त्यावेळी पोलिस बंदोबस्त घेतला जातो, पण मोजणी होऊ नाही शकल्यास न्यायालयात दाद मागावी लागते.

दरमहा सुमारे ७५० शेतकरी मोजणीसाठी करतात अर्ज

शेजारील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केल्यानंतर भूमिअभिलेखचे कर्मचारी परत येतात. अशावेळी संबंधित शेतकरी निमताना मोजणीसाठी अर्ज करू शकतो, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी येऊन मोजणी करतात. पण, पोटहिश्श्यातील शेतकऱ्याचा कायमचा विरोध असल्यास त्या गटाची मोजणी न्यायालयाच्या आदेशानुसारच करावी लागते. दरमहा सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७५० शेतकरी मोजणीसाठी अर्ज करतात.

- दादासाहेब घोडके, अधीक्षक, भूमिअभिलेख, सोलापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.