नागपूर : सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी नागूरहून थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) यांच्या पाठपुराव्यानंतर ही मागणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्याने हे विमानतळ आता २४ बाय ७ कार्यरत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरहून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आशिष काळे यांनी सांगितले. त्यांनी या मागणीवर भर देत आर्थिक वाढीस चालना मिळण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
नुकतीच नागपुरात ७ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी विदर्भात आपले काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर आणि इतर विमान कंपन्यांसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली आहे.
यापूर्वीही मांडला विषयही मागणी नवी नाही. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्ली येथे गडकरी यांनी हा मुद्दा मांडला होता. मात्र, त्यावेळी धावपट्टीच्या कामामुळे उड्डाणांवर निर्बंध होते. सध्या नागपूर हे एक महत्त्वाचे व्यावसायिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. टीसीएस, पर्सिस्टंट सिस्टम्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा यासारख्या कंपन्या येथे आहेत.