नाशिक : शेतकरी कर्जमाफीतून लग्न, साखरपुडे करतात, अशा वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मस्करीमध्ये बोललेल्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कोकाटे यांनी रविवारी (ता.६) नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घेतले.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
कोकाटे काय म्हणाले होते?अवकाळी पावसामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी माडसांगवी (ता.नाशिक) येथे गेलेल्या कृषिमंत्र्यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारणा केली. शेतकऱ्याच्या याच प्रश्नाचे उत्तर देताना, कर्ज घ्यायचे आणि पुढील पाच-दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची, असे शेतकरी करतात.
कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? कर्जाच्या पैशातून साखरपुडे करा, लग्न करा, या विधानामुळे कोकाटे अडचणीत सापडले होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.