'बाळंतिणीचा जीव मोकळा करण्यात पुण्य वाटतं', 1500 हून अधिक बाळंतपणं करणाऱ्या पेराआजीची गोष्ट
BBC Marathi April 07, 2025 02:45 PM
Sampat More

जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर प्रसूतीदरम्यान 30 वर्षांच्या ईश्वरी भिसे यांचा पुण्यात उपचारात उशीर झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं. डिपॉझिट न भरल्यानं उपचार लांबवले गेले आणि ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केलाय.

हे सगळं ऐकलं, पाहिलं आणि मला आमच्या गावच्या पेराआजीची आठवण झाली.

अजिबात शाळा न शिकलेली आमची पेराआजी माणूस म्हणून किती थोर होती हे आम्ही अनुभवलं. आज ती नाही.

तिचेच हे शब्दचित्र.

बाळंतिणीची सोडवणूक करणारी पेराआजी

एकीकडे 'स्त्रीरोग तज्ज्ञ'ची डिग्री असूनही माणुसकी विसरणारे संवेदनाशून्य डॉक्टर.

तर दुसरीकडे बाळंतिणीची वेदना ऐकून घायाळ होणारी, पळत जाऊन तिची सोडवणूक करणारी आमच्या गावची पेराआजी.

आज तिची आठवण येते.

तिने उभ्या आयुष्यात 1500 च्या वर बाळंतपणं केली. रात्री-अपरात्री, हातातलं काम सोडून, तोंडातला घास टाकून अडल्या घरी धाव घेतली. त्या बदल्यात जोंधळा आणि चोळीच्या खणावर समाधान मानलं.

बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या लेकीचे दिवस भरल्यावर घरातले सगळेच काळजीत असतात. रात्री-अपरात्री मुलीच्या पोटात दुखायला लागले, तर काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो.

पण ज्या गावात पेराबाई असते, त्या गावात मात्र मुलीचे आईवडील निश्चिंत असतात. त्यांना कसलीच काळजी नसते.

मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर ती नवऱ्याला सांगते, 'आव जावा, पेराबाईला घेऊन या'

तो उठून पेराबाईच्या घरी जातो. दारात उभा राहून आत पाहून आवाज देतो, 'पेरामावशी मी हाय. पोरीच्या पोटात दुखायला लागलंय.'

ते ऐकून पेराबाई उठून चालायला लागते. पेराबाई त्याच्या पुढं चार पावलं चालत असते. तिला त्या अवघडलेल्या पोरीची काळजी लागलेली असते.

घरात आल्यावर पेराबाई मुलगी, ज्या खोलीत असते, तिथं जाते. बाहेर मुलीचा बाप काळजीत असतो. पंधरा-वीस मिनिटांनंतर आतून मूल रडल्याच आवाज कानावर येतो, बाहेर पोरीचा बाप सुस्कारा टाकतो. पेराबाई बाहेर येते आणि म्हणते, 'जीव मोकळा झाला'. हा खास तिचाच शब्द.

पुन्हा तीच म्हणते, 'नातू झाला, बघ तुला. पोरीच्या सासरी कळवा'

'मावशी, तुम्ही हुता म्हणून बरं. न्हायतर रात्रीचं काय करणार हुतो, आम्ही'

थक्क करणाऱ्या गोष्टी

या प्रसंगातील पेराबाई म्हणजे, पेराबाई बाळू गोतपागर. सांगली जिल्ह्यातील रामापूर गावची. सुईणीचं काम करणारी. तिनं आजवरच्या आयुष्यात पंधराशेच्या वर बाळंतपणं केलेली आहेत.

ही बाळंतपणं करताना एकही 'गहाळ' (हा शब्द पेराबाईचा) झालेलं नाही, म्हणजे सर्व बाळंतपणादरम्यान मूल किंवा आई सुखरुप राहिली आहेत.

औपचारिक अर्थानं कसलही शिक्षण न घेतलेल्या, पेराबाईंनी गावातील आणि पंचक्रोशीतील बाळंतपणं केलेली आहेतच, पण अनेक वेळा तालुक्याच्या गावातील सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनीही एखाद्या अवघड वाटणाऱ्या केसमध्ये त्यांना बोलावून त्यांची मदत घेतली आहे.

नव्हे, डॉक्टरांना अवघड वाटणारी डिलिव्हरी पेराबाईंनी सोपी केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन शरीरशास्त्राचा कसलाही अभ्यास न केलेल्या, पेराबाईच्या सुईणपणाच्या गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत.

'तुम्हाला जमतं कसं?'

यावर त्या एका शब्दात सांगतात, 'तसंच'

इतकी वर्षं हे काम करूनही त्यांना काही विशेष वाटत नाही. त्यांची मुलाखत घेतल्यावर त्यांचा फोटो काढायला लागलो, तर म्हणाल्या. 'माझा फोटो कशाला घेताय?'

मी फोटो काढतोय, हे त्यांना वेगळंच वाटत होतं. तासा-दीड तासाच्या मुलाखतीत, त्यांनी त्यांच्याबद्दलची बरीच माहिती सांगितली.

Getty Images

त्या म्हणाल्या, 'गावात एक आऊ नावाची म्हातारी हुती. मी नांदायला आल्यावर तिच्याजवळ बसायला जात हुते. ती सुईण होती. तिला माणसं बोलवायला यायची. एक दिवस ती मला घेऊन गेली. लई अवघड बाळतपण हुतं. पण आऊनं तिचं सुखरूप बाळंतपण केलं.

मग मी वरीसभर तिच्यासोबत जात हुते. ती मला कंबर धरायला लावायची. एक दिवस आऊनं मलाच, एक बाळंतपण करायला लावलं. आऊ सांगंल तशी, मी करत हुते. शेवटी ते बाळंतपण झालं.

त्या दिवशी आऊ मला म्हणाली, 'पोरे, आजपासून तूच हे काम करायचं.' त्यानंतर आठ-दहा वेळा आऊ सोबत आली. पुन्हा माझी मीच एकटं जायला लागले. मला एकटीला सुईणपण जमायला लागलं. एखाद्याचा जीव मोकळा करण्यात मला पुण्य वाटायला लागलं.'

सुईणीचं काम करताना पेराबाईला आलेले अनेक अनुभव त्यांनी सांगितले.

एका घरात त्या बाळंतपण करायला गेल्या होत्या. त्या आत गेल्या. जिचं बाळंतपण होतं, तिला खूप वेदना होत होत्या. तिनं त्या रागात जवळ आलेल्या पेराबाईचा कडकडून चावा घेतला.

रुपयाएवढा तुकडा निघाला. त्या रक्तबंबाळ झाल्या, एवढं होऊनही पेराबाई त्या मुलीवर रागावल्या नाहीत. जखमेची पर्वा न करता, त्यांनी त्या मुलीचं बाळंतपण केलं. ते झाल्यावरच त्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या.

त्या म्हणतात, 'त्या पोरीला कळ सोसली न्हाय, काय करणार?' त्यांचं हे म्हणणं ऐकल्यावर क्षमाशीलता जगणाऱ्या या बाईबद्दलचा आदर खूपच वाढतो.

ज्या काळात गावात दळणवळणाची साधनं नव्हती. डॉक्टर नव्हते, त्या काळात पेराबाई गोतपागर यांनी केलेलं काम खूप मोलाचं आहे. त्या अभिमानान सांगतात 'माझ्या हातून याकबी गहाळ झाल्यालं न्हाय.'

Getty Images

अजून एक अनुभव त्यांनी सांगितला.

गावाच्या बाहेर भटक्यांची पालं उतरली होती. त्यांच्यात एक गरोदर बाई होती. तिच्या पोटात दुखायला लागलं, तेव्हा तिचा नवरा गावात आला. सुईणीची चौकशी करायला लागला.

पेराबाईची माहिती कळल्यावर तो पेराबाईच्या घरी गेला. मग पेराबाई त्याच्यासोबत पालावर गेल्या. तिथं त्या बाईला धीर देत, तिचं बाळंतपण केलं. पण तेवढ्यावरच ती थांबली नाही. एका लेकीसाठी आईनं जे करायला पाहिजे, ते सगळं तिनं केलं.

त्या बाईला गरम पाण्यानं अंघोळ घालण्यापासून ते तिला चांगलंचुंगलं खायला घालण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिनं पार पाडली.

यावर त्या सहजपणे म्हणतात, 'आपलीच लेक असती, तर केलं असतं का न्हाय? बाळंतपण म्हंजी दुसरा जन्म असतुया बाईचा, तवा जायाचं न्हाय तर कवा जायाचं?'

त्या काळात पेराबाई एवढं जोखमीचं काम करत होती. बोलवायला आलं तेव्हा, लेकीसुनांच्या सोडणुकीसाठी धावून जात होती. अगदी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना नर्सना अवघड वाटणारी डिलिव्हरी तिने तिच्याजवळ असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या बळावर सोपी केली होती.

हे अवघड काम करण्याच्या बदल्यात पेराबाईला काय मिळत होतं? असा प्रश्न आजच्या महागड्या प्रसूतीगृहाच्या दरांच्या पार्श्वभूमीवर पडतो.

हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, 'एक बाळंतपण केलं, की पायल्या-दोन पायल्या जुंधळं मिळायचं. एखादा चोळीचा खण मिळायचा.'

Getty Images

बाळंतपणासारखी अवघड कामं, रात्री-अपरात्री जाऊन, कधी जेवत्या ताटावरून उठत तसाच हात धुऊन उठणारी, एखाद्याच्या पोरगीचं पोट दुखतंय हे ऐकल्यावर, त्या पोरीचा जीव सोडवायला पळत जाणारी पेराबाई ही ग्रेट बाई आहे.

तिने केवळ जोंधळ्यावर आणि चोळीच्या खणावर शेकडो घरांवर डोंगराएवढे उपकार केले आहेत. ही बाई किती मोठी आहे, हे ज्यांच्या घरात जाऊन तिनं बाळंतपण केलं आहे, त्यांना माहिती आहे. पण तिच्या या मोठेपणाचं चीज झालेलं नाही.

तिनं आजवरच्या आयुष्यात केलेले काम किती मोठं आहे, हे तिलाही माहीत नाही. ती सहजपणे म्हणते, 'मला जमतंय तर नको का करायला?' स्वत:च मोठेपणा न मिरवणारी ही नि:स्पृह म्हातारी आहे. आता पेराबाई थकलीय.

गेल्या दोन वर्षात तिने सुईणीच काम बंद केलंय. मला म्हणाली, 'पोरा, ताकद न्हाय राहिली रं अंगात. आजपातूर कुणाच आरं म्हणून घेतलेलं न्हाय. आता म्हातारपणी कशाला म्हणून घ्याचं? म्याच लोकास्नी सांगती, मला न्हाय जमत म्हणून.'

पेराबाई रस्त्यावरून निघालेली असते. एक गाडीवाला जवळ येऊन थांबतो. विचारतो, 'पेराआज्जे वळखलं का?'

पेराबाई त्याच्याकडं बघते.

'न्हाय बाबा. कुणाचा रं तू?'

मग तो ओळख सांगतो.

पटकन काहीतरी आठवल्यासारखं करून ती म्हणते 'आरं बाळा तू हायीस व्हय? आर म्या आंघोळ घातलिया तुला. कुठं अस्तुस? लगीन याव झालं का?'

आजी त्या पोराची आस्थेनं चौकशी करत राहते. तिच्यासमोर सगळा भूतकाळ उभा राहिलेला असतो. ते पोरगं खाली वाकतं, तिच्या पाया पडतं. तिचा खडबडीत हात त्याच्या डोक्यावरून फिरत राहतो. ते दृश्य पाहून रस्त्यानं जवळून जाणारा हेलावतो.

त्या पोराला आशीर्वाद देऊन पेराबाई निघून जाते. ती गेलेल्या दिशेला पोरगं बघत राहतं. ते घरात जाऊन आईला सांगणार असतं.

'आये, मला आज पेराआज्जी भेटली व्हती.'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.