सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा मार्चा
वाशी, ता. २ (वार्ताहर) : सिडकोच्या २६ हजार घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी मनसेने यापूर्वी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन केले होते, मात्र सिडकोने घरांच्या किमती कमी करण्यास नकार दिल्याने मनसेने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच गुरुवारी (ता. ३) मनसे ‘इंजेक्शन मोर्चा’ काढणार आहे.
आज बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर, दुपारी मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारकांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली. या भेटीत घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली, मात्र सिडको अधिकारी घरांचे दर कमी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. या बैठकीत बोलताना गजानन काळे म्हणाले की, सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. घरांच्या किमती खूप जास्त आहेत आणि सामान्य नागरिकाला त्या परवडणाऱ्या नाहीत. सिडकोने घरांचे दर ठरवताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. सिडको अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असेही ते म्हणाले.
सिडको अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे मनसेने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी (ता. ३) सिडको भवनावर मनसे आणि सिडको सोडतधारकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून सिडको प्रशासनाला जोरदार धक्का देण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
......................
सिडकोधारकांना दिलासा
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे आश्वासन दिल्याने सिडको सोडतधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र सिडको प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास मनसे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत मनसे महिला सेना शहर अध्यक्ष आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई आणि सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.