धुळे- आनंदखेडे (ता. धुळे) येथे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. या घटनेत गोठ्यातील आठ म्हशींसह सहा पारडूंचा होरपळून मृत्यू झाला. तसेच दोन म्हशी जखमी झाल्या. शिवाय गोठ्यात साठवून ठेवलेला मका, गहू व ढेपदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत शेतकऱ्याचे पशुधनासह अन्नधान्याचे सुमारे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग कोणीतरी लावल्याचा संशय व्यक्त होत आहे. आनंदखेडा (ता. धुळे) येथील शेतकरी पीतांबर फकिरा पाटील (भामरे) यांची कुसुंबा (ता. धुळे) रस्त्यावर शेती आहे. शेतातच त्यांनी पशुधनाचा गोठा बांधला आहे. पशुधनासाठी लागणारा चारा, ढेप व शेतीमालही ते गोठ्यात साठवून ठेवतात.
गोठ्याला बुधवारी (ता. २) पहाटे तीनच्या सुमारास लागली. या गोठ्याजवळच सालदार कर्मा मोतीराम पवार झोपलेला होता. आगीच्या झळांमुळे त्याला चारच्या सुमारास जाग आली. त्यामुळे त्याने लागलीच पीतांबर पाटील यांना मोबाईलवरून आगीची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
जनावरे होरपळली
यादरम्यान आगीत दहा म्हशी व सहा पारडू मृत्युमुखी पडले. यातील पाच ते सहा म्हशी गर्भधारण झालेल्या होत्या. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन म्हशीदेखील किरकोळ भाजल्या. गहू, मका व शेतीसाहित्य जळून खाक झाले. अन्य पशुधन काही अंतरावर असल्याने त्यांचा जीव बचावला. घटनेची माहिती मिळताच गावातील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश अमृतसागर, मनोज गवते, प्रवीण जाधव, सरपंच तुलसीदास अहिरे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आगीत होरपळून मृत झालेल्या जनावरांचे दृश्य पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
शेतीमालाची मोठी हानी
गोठ्याच्या ठिकाणी २५ पोते मका, ५० पोते ढेप तसेच ४० ते ५० पोते गव्हाचा ढीगदेखील होता. आगीत सर्वकाही जळून नुकसान झाले. पशुधनासह शेतीमाल, पशुखाद्य मिळून ६० ते ७० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे परीविक्षाधिन उपविभागीय अधिकारी सागर देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घटनेची पहाणी करीत पंचनामा केला.