सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट रोडवरील वळसंग परिसरातील साहेबलाल वस्तीजवळ बसलेल्या सादिक महिबूब पठाण (वय ३१, रा. बालाजी नगर, कुंभारी) याला चौघांनी बेदम मारहाण केली. त्यात सलमान राज अहमद शेख याने त्याच्याकडील तलवार डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वार चुकविताना सादिकच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली आहेत.
दोन दिवसांपूर्वी सादिक पठाण हा साहेबलाल वस्तीजवळ थांबला होता. त्यावेळी सलमान शेख व अरबाज बागवान हे दोघे अन्य दोघांना घेऊन दुचाकीवरून त्याठिकाणी आले. काही समजण्यापूर्वीच सलमानने त्याच्याकडील तलवार काढून डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तो वार अडविल्याने हाताच्या बोटांना गंभीर जखम झाली.
त्यानंतर त्या सर्वांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी देखील सलमानने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, तो उजव्या हाताच्या कोपराला लागला. मारहाण करत असताना ओरडल्याने जवळच्या सैपन टी कॉर्नरवरील एकजण जोरजोरात ओरडला. तो आपल्याकडे येत असल्याचे पाहून चौघेही शिवीगाळ, दमदाटी करुन निघून गेले, अशी फिर्याद सादिक पठाण याने वळसंग पोलिसांत दिली.
सुरवातीला जखमी सादिकला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सहकारी रुग्णालयात हलविले. तो गंभीर जखमी असल्याने पोलिसांनी जबाब देखील नोंदवला नाही. संशयित आरोपी देखील अजूनही फरारच आहेत. पोलिस उपनिरीक्षक दासरी तपास करीत आहेत.