Shahpur News : लग्न वेळेवर लावायचे नाही ; मुहूर्त काढतातच कशाला?
esakal April 03, 2025 08:45 PM

वासुदेव चव्हाण : शहापूर (ता. जामनेर)- कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुण्या मंडळींना ताटकळत ठेवून उशिरा लग्न लावणे एक फॅशन होऊ पाहत आहे, याविषयी सर्व स्तरातून नाराजी असली तरी कोणी याबाबत पुढाकार घेत नसल्याने साडेबाराचे विवाह दोन, अडीच वाजता लागत आहेत. विवाह मुहूर्तावर लागत नसेल तर मुहूर्त का काढायचा, असा प्रश्न काही जाणकार उपस्थित करीत आहेत.

खानदेशमध्ये यावर्षी मार्चमध्येच तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला होता. तरीही विवाह उशिरा लागत असल्याने मग वऱ्हाडी मंडळी तापमानाचा पारा सहन होत नसल्याने व विवाह मुहूर्तावर लागत नसल्याने बरेचसे नातेवाईक मंडळी विवाह सोहळ्याला हजेरी लावून पुढच्या विवाह सोहळ्यासाठी गुपचूप निघून जाणे पसंत करीत आहे.

दोन तास उशिराने विवाह

मुहूर्त काढून मुहूर्तावर विवाह लावायचा नसेल तर हा ढोंगीपणाचा म्हणावा लागेल, असेही वऱ्हाडी मंडळीचे म्हणणे आहे. विवाह हा आयुष्यातील एक अनमोल क्षण असून तो संस्कार देखील आहे. हे वरपिता व वधूपिता यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उन्हातान्हात विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळी त्यांच्यासोबत आलेल्या लहान पाल्यांचा विचार करून विवाह वेळेत लागतील, अशी अपेक्षा वऱ्हाडी मंडळी करीत आहेत.

वेळेची किंमत नाही

मुहूर्त काढले तर मग दोन, पाच मिनिटे इकडे की तिकडे होऊ शकतात पण तब्बल दीड, दोन तास उशीर होत असेल तर संबंधितांना वेळेची कदर नाही, असे दिसते. नोव्हेंबरपासून तर मार्चअखेर एकही विवाह वेळेवर लागला नाही, अशी खंत मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे. श्री. पाटील यांनी मागील वर्षी जामनेर तालुक्यात विवाह सोहळे वेळेवर लावणाऱ्या वधुवरांना पाच हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तेव्हा ६५० विवाहांपैकी २४ विवाह सोहळे वेळेवर साजरे झाले होते, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.