अफगाण नागरिकांविरोधात पाकिस्तान सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. शेकडो अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना प्रत्यार्पणासाठी छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. छापे टाकून बेकायदा अफगाणींना ताब्यात घेतले जात आहे. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये पाठवले जात आहे. त्यानंतर तोरखम सीमेवरून त्यांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत स्वेच्छेने देश सोडण्याच्या शेवटच्या तारखेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानने बेकायदा राहणाऱ्या अफगाण नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे. अफगाण नागरिक कार्ड धारकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या निर्देशानुसार, जर एखादा अफगाणी गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळले तर संपूर्ण कुटुंबाने देश सोडला पाहिजे.
तालिबान सरकारने पाकिस्तानला प्रत्यार्पणाची प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची विनंती केली होती परंतु इस्लामाबादने त्याकडे दुर्लक्ष केले. अफगाणिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तान वैध कार्डधारकांनाही अनिश्चिततेत ढकलत आहे.
पाकिस्तानमध्ये 13 लाखांहून अधिक अफगाणी नागरिक राहतात. यापैकी 7 लाखांहून अधिक खैबर पख्तुनख्वा (केपी) मध्ये आहेत. बलुचिस्तानमध्ये 3.17 लाख, सिंधमध्ये 74,117, पंजाबमध्ये 1.93 लाख आणि इस्लामाबादमध्ये 42,718 अफगाण निर्वासित आहेत.
अफगाण नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करू नये, असे आवाहन तालिबान सरकारने मंगळवारी इस्लामाबादला केले. अफगाणिस्तानचे निर्वासित आणि प्रत्यार्पण मंत्री मौलवी अब्दुल कबीर यांनी शेजारी देश पाकिस्तान आणि इराणला ही हद्दपारी थांबवावी आणि अफगाणांना स्वेच्छेने मायदेशी परतण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाकिस्तानच्या हद्दपारीच्या धोरणाचा निषेध केला आहे. अफगाणिस्तानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर निर्वासितांना परतताना भेडसावणाऱ्या गंभीर धोक्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
पेशावरमधील अफगाण आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने डॉन वृत्तपत्राने सांगितले की, ही मुदत 31 मार्च होती, परंतु प्रांतीय सरकारने ईद लक्षात घेऊन 2 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. दुसरा टप्पा गुरुवारपासून सुरू झाला आहे. आम्ही लांडी कोटल आणि नासिर बाग रोड येथे प्रत्येकी एक छावणी उभारली आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने अधिकृत आकडेवारीचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, 1 एप्रिलपर्यंत एकूण 8,86,242 कागदपत्रे नसलेल्या अफगाणी नागरिकांनी पाकिस्तान सोडले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी संस्थेचे (UNHCR) प्रतिनिधी फिलिप कॅंडलर म्हणाले, “पाकिस्तान अफगाण निर्वासितांना अनिश्चित काळासाठी आश्रय देईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मात्र, मानवतावादी मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
अफगाण नागरिकांमुळे सुरक्षेला धोका असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाण निर्वासितांचा दबाव वाढला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थितीही या निर्वासितांचा भार पेलू शकत नाही.