"नवरा व्हेंटिलेटरवर अन्..." कठीण काळात स्वामी असे उभे राहिले मराठी अभिनेत्रीच्या पाठीशी ; म्हणाली...
esakal April 03, 2025 09:45 PM

Marathi Entertainment News : लोकगीते, कोळीगीतांमधून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा कुडची उत्तम नृत्यांगना देखील आहेत. मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. अनेक मालिकांमध्ये त्या खलनायिकेच्या रूपात दिसतात. ''बिग बॉस मराठी ३' मध्ये त्या दिसल्या होत्या. त्या सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक प्रसंग सांगितलाय जेव्हा त्यांना स्वामींच्या इच्छाशक्तीचा प्रत्यय आला.

त्यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. यात बोलताना सुरखा म्हणाल्या, 'माझा नवरा फिल्मलॅबला कॅमेरामन होता. तो अचानक आजारी पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मला फोन आला आणि लगेच मुंबईत यायला सांगितलं. आमचं मुंबईत कोणीच नव्हतं. कोल्हापूरचं सासर आणि माहेर पुणे. मी मुंबईत आले तोवर तो कोमात गेला होता. बाकीच्यांना यायला दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. डॉक्टरांनी माझ्या वडिलांना सांगितलं की ही आमच्या हाताबाहेरची केस आहे. लिव्हर खराब झालं होतं त्यात त्याने ड्रिंक केलं होतं जे पसरलं होतं. ही लास्ट स्टेज, आम्ही काहीच करु शकत नाही.'

त्या पुढे म्हणाल्या, 'आम्ही विचारलं की ट्रान्सप्लांट होईल का आणि किती खर्च येईल? ते म्हणाले २५ लाख रुपये खर्च येईल. ही गोष्ट २०१३ सालची आहे. तेव्हा एवढा खर्च खूप मोठा होता. मी दोन फ्लॅट घेऊन ठेवलेच होते. एक मुंबईत आणि एक कोल्हापूरमध्ये होता. काही वेळ आली तर मी घर विकेन असं मी वडिलांना सांगितलं. बरं उद्या ऑपरेशन म्हणजे आज घर विकून लगेच पैसे मिळतील इतकी काही घर विकणं सोपी गोष्ट नसते. मला काहीच सुधरत नव्हतं. मग मी दादरच्या मठात गेले. लोक मला ओळखत असतानाही मी सर्वांसमोर तिथे बसून ढसाढसा रडत होते.'

सुरेखा आठवण सांगत म्हणाल्या, 'मी स्वामींना म्हटलं की घर विकू की नको मला निर्णय घ्यायचा आहे. मार्ग दाखवा. तीन दिवस झाले नवरा लास्ट स्टेजवर आहे. कधीही जाईल अशा परिस्थितीत आहे. मी घर विकायचं की नाही याचा योग्य निर्णय घ्या. जर मी घर विकलं आणि त्याला व्यवस्थित घरी आणलं तर मग नंतर माझ्यावर ही वेळ आणू नका. माझा संसार व्यवस्थित चालू द्या. पण मी घर विकलं आणि दोन वर्षांनंतर हीच परिस्थिती आणणार असाल तर मग मला मार्ग दाखवा. हे मी गुरुवारी रात्री मठात बसून बोलले आणि शनिवारी सकाळी तो गेला. मला वाटतं हा अनुभवच आहे.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.