Lok Sabha News : लोकसभेमध्ये वक्फ विधेयकावर बुधवारी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी एक शब्दही बोलले नाहीत. गुरूवारी मात्र त्यांनी परराष्ट्र धोरणाशी संबंधित दोन मुद्द्यांवर केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आपले परराष्ट्र सचिव चीनच्या राजदुतांसोबत केक कापत असल्याचे सांगून त्यांनी गलवानमध्ये शहीद झालेल्या 20 जवानांच्या बलिदानाचा मुद्दा काढला. तसेच अमेरिकेने लादलेल्या टेरिफवरही त्यांनी सरकारला प्रश्न केला.
चीनने भारताच्या 4 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचे सांगत म्हणाले, चीनने आपली 4 हजार चौरस किमी जमीन घेतली आहे आणि आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री त्यांच्या राजदुतांसोबत केक कापत आहेत. आपले 20 जवान शहीद झाले आणि त्यांच्या बलिदानाचे सेलिब्रेशन केक कापून होत आहे. चीनने आपल्या मोठ्या जमिनीवर कब्जा केला आहे. आम्ही आपली जमीन आपल्याला परत मिळायला हवी.
परराष्ट्र धोरणावरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. ने भारतावर 26 टक्के टेरिफ लावला आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. ऑटोसह इतर क्षेत्रांवर विपरित परिणाम होणार आहे. टेरिफच्या मुद्द्यावर भारत सरकार काय करणार आहे, याचे उत्तर देण्याची मागणी राहुल गांधींनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा काढल्यानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारत स्वतंत्र झाल्यापासून देशाच्या सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी भारतीय सेनेची होती. हिंदी-चीनी भाई-भाई असे म्हणत पाठीत खंजीर खुपसणारे त्यावेळी कोण होते, कुणाचे सरकार होते. डोकलामच्या घटनेनंतर चीनच्या अधिकाऱ्यांसोबत चायनीज सूप पिणारे नेते कोण होते, असे सवाल ठाकूर यांनी केले.
राजीव गांधी फाऊंडेशनने चीनच्या अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले होते का, का घेतले होते, हे सांगावे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री डोकलाम घटनेनंतर सीमेवर गेले होते. एक इंचही जमीन चीनने घेतलेली नाही. काही लोक चीनसोबत मिळून खोटे आरोप करत असून राजकीय भाकऱ्या भाजतात, अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली.