लॉस एंजलिस : ‘टॉप गन’ चे आयसमन, ‘बॅटमॅन फॉरएव्हर’मधील बॅटमॅन आणि ‘द डोअर्स’मध्ये जिम मॉरिसन यांची भूमिका साकारणारे अभिनेता व्हॅल किल्मर (वय ६५) यांचे मंगळवारी रात्री आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या कन्या मर्सिडीज किल्मर यांनी ही माहिती दिली.
किल्मर यांना २०१४ मध्ये घशाचा कर्करोग झाल्याने उपचारादरम्यान दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मात्र, त्यावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा तीव्र संसर्ग झाला आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले.
व्हॅल किल्मर यांचा जन्म आणि शिक्षण लॉस एंजिलिसमध्ये झाला. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी ज्युलिअर्ड स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हा ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते.
१९८० च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि टॉप सिक्रेट (१९८५) आणि रिअल जिनिअस (१९८५) सारख्या चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली. किल्मर यांनी त्यांच्या भूमिकांसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले.
टॉम्बस्टोन चित्रपटातील ‘डॉक हॉलिडे’ची भूमिका अधिक वास्तवदर्शी वाटावी म्हणून त्यांनी पलंगावर बर्फ ठेवून झोपण्याचा प्रयोग केला. व्हॅल किल्मर यांनी अभिनेत्री जोआने व्हॅलीसोबत विवाह केला, मात्र नंतर ते विभक्त झाले. मर्सिडिझ आणि जॅक किल्मर अशी दोन मुलं आहेत. त्यांनी ‘आय एम युअर हक्लेबेरी’ नावाचे आत्मचरित्र लिहिले. तसेच, कविता, चित्रकला आणि धार्मिक विचारसरणी यात त्यांची विशेष रुची होती.