सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : महाराष्ट्रातील बँकेतील व्यवहार तसेच महाराष्ट्रातील आस्थापनांमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मनसैनिकांना केले होते. त्यानुसार ठाण्यात टपाल विभागासमोर गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांसह महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय व इतर शासन संचालित आस्थापनांना दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, पण या आदेशाचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत असल्याने सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित आस्थापनांचे प्रमुख तसेच शासनाची मराठी भाषा समिती यांना दिली आहे. तरीदेखील ठाण्यातील टपाल विभागात या आदेशांची राजरोसपणे पायमल्ली केली जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी ठाण्यातील पोखरण रोड येथील टपाल कार्यालयात धडक देऊन तेथील विभागीय प्रमुखांना शासन आदेशाची आठवण करून दिली. तसेच स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचा संदेश असलेली प्रतिमा भेट देताना १५ दिवसांत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही,तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.