पुणे स्टार्टअप एक्स्पो १० एप्रिलपासून
esakal April 04, 2025 12:45 AM

पुणे, ता. ३ : देशातील आणि राज्यातील नवोदित उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्टार्टअपना चालना देण्यासाठी डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल आणि एमआयटी-डब्लूपीयु यांच्यातर्फे ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे १० एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एक्स्पोच्या आयोजिका अमृता देवगांवकर यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
यावेळी अमृत श्रोत्री, सीमा काळे, नीलिमा अलूलकर, मानसी ठाकूर, दीपा बडवे, कृष्णन वर्मा, गार्गी कुलकर्णी आणि सर्वेश मेहेंदळे उपस्थित होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक्स्पो १० एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कोथरूड येथील एमआयटी-डब्लूपीयु संस्थेत होणार आहे.
देवगांवकर म्हणाल्या, ‘‘या उपक्रमामुळे राज्याच्या विविध भागातील नवोदितांच्या स्टार्टअपना एक व्यासपीठ तर विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे. तर स्टार्टअपना थेट गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअपसाठी संकेतस्थळावर एआय-एमएल, फॅशन, अॅग्रिकल्चर अँड फूड, एंटरटेनमेंट अँड मीडिया, बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि हेल्थकेअर व बायोटेक असे विभाग करण्यात आले असून यामुळे जास्तीत जास्त स्टार्ट अप यासाठी नोंदणी करू शकतात.’’
स्टार्ट अपसाठी देखील संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरू असून त्यांना येथे आपल्या स्टार्टअपची माहिती देऊन गुंतवणूकदार, मेंटर आणि उद्योजकांशी चर्चा करता येईल. स्टार्टअपमधील सर्वोत्तम स्टार्टअप हे येत्या १० एप्रिलच्या एक्स्पोमध्ये सादर केले जातील आणि या ठिकाणी त्यांना थेट गुंतवणूकदारांना आपल्या स्टार्टअपची माहिती देता येईल. शिवाय या एक्स्पोमध्ये अनेक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, मेंटर यांच्याशी देखील त्यांना थेट संवाद साधता येणार आहे. स्टार्टअपसाठी संकेतस्थळावर एआय-एमएल, फॅशन, अॅग्रिकल्चर अँड फूड, एंटरटेनमेंट अँड मीडिया, बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि हेल्थकेअर व बायोटेक असे विभाग करण्यात आले असून यामुळे जास्तीत जास्त स्टार्टअप यासाठी नोंदणी करू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

युवकांना मोठी संधी
‘‘या एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील स्टार्टअपना त्यांची नवकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे. सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://punestartupexpo.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या स्टार्टअपची नोंदणी करावी. विद्यार्थ्यांना आपल्या स्टार्टअपची पीपीटी प्रेझेंटेशन, सविस्तर माहिती अथवा व्हिडिओ अपलोड करता येईल. सर्वोत्तम स्टार्टअप कल्पनांची निवड करून त्यांना एक्स्पोमध्ये सादर करण्याची संधी दिली जाईल. तसेच, उत्कृष्ट स्टार्टअप कल्पनांना बक्षिसेही प्रदान करण्यात येणार आहेत,’’ असे संयोजक अमृता देवगांवकर यांनी नमूद केले. हा एक्स्पो सर्वांसाठी खुला असून, प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.