आपटाळे, ता. ३ : श्रीराम नवमी व श्री काशी आई देवी यात्रा उत्सव निमित्ताने काले (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती यात्रा उत्सव समितीच्या वतीने सरपंच कुलदीप नायकोडी यांनी दिली.
यानिमित्ताने सकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील ग्रामदेवतांचे अभिषेक, मांडव डहाळे, सकाळी १० ते १२ या वेळेत सुभाष महाराज खलाटे यांचे देव जन्माचे कीर्तन, दुपारी १ ते ४ या वेळेत संगीत भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत काशी आई देवी काठी मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता दंडवते, महाप्रसाद, सद्गुरु गोसावी बाबा महाराज काठी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहे. तर दीपाली सुरेखा पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.