आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 15 व्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादवर जबरदस्त विजय मिळवला आहे. कोलकाताने हैदराबादचा 80 धावांनी धुव्वा उडवला आहे. कोलकाताने हैदराबादसमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 16.4 ओव्हरमध्ये 120 धावांवर गुंडाळलं. केकेआरने यासह या हंगामातील दुसरा विजय मिळवला. केकेआरने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादचा हा या मोसमातील सलग तिसरा आणि इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
केकेआरच्या गोलंदाजांसमोर सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सपशेल ढेर झाले. केकेआरने हैदराबादच्या टॉप ऑर्डरमधील 3 स्फोटक फलंदाजांना झटपट गुंडाळलं आणि विजयाचा पाया रचला. ट्रेव्हिस हेड 4, तर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे दोघे प्रत्येकी 2-2 धावा करुन आऊट झाले. केकेआरने या तिघांना आऊट करत 50 टक्के सामना इथेच जिंकला. त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादला ठराविक अंतराने झटके देणं सुरुच ठेवलं.
नितीश रेड्डी याने 19 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कामिंदु मेंडीस याने 27 रन्स केल्या. तर हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक 33 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स याने 14 धावा जोडल्या. तर शेवटच्या काही फंलदाजांना गुंडाळत केकेआरने एकतर्फी विजय मिळवला. केकेआरसाठी वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेल याने दोघांना गेट आऊट केलं. तर हर्षित राणा आणि सुनील नारायण या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना अप्रतिम साथ दिली.
दरम्यान हैदराबादचा हा आयपीएलमधील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव ठरला. केकेआरआधी चेन्नईने हैदराबादला 17 व्या मोसमात 78 धावांनी पराभूत केलं होतं. तर त्याआधी चेन्नईनेच 2023 साली 77 धावांनी धुव्वा उडवला होता.
केकेआर जितबो रे
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, मोईन अली, आंद्रे रसेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), कामिंडू मेंडिस, सिमरजीत सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि जीशान अन्सारी.