पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रूग्णालयाने महिलेच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाख रूपये भरण्यास सांगितले. महिलेच्या कुटुंबाने 3 लाख भरण्याची तयारी दाखवली, पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला प्रवेश नाकारला. यानंतर गर्भवतीला दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दोन मुलींना जन्मही दिला. मात्र यानंतर महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेच्या मृत्यूबाबत राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. (Maharashtra State Women’s Commission takes note of the death of a pregnant woman in Pune)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने 2 जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
तनिषा सुशांत भिसे असे मृत्यू झालेल्या गर्भवतीचे नाव आहे. तर मृत्यू झालेल्या महिलेचे पती सुशांत भिसे हे
भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. तनिषा सुशांत भिसे या दीनानाथ रूग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. तिने त्यांना 10 लाख रूपये भरा, अन्यथा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तीन लाख रूपये भरण्याची तयारी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी दर्शवली. मात्र गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया आहे, असे सांगून रुग्णालय प्रशासनाने उपचारासाठी दाखल करण्यास नकार दिला. या धावपळीत दुसऱ्या रूग्णालयात तनिषा भिसे यांना दाखल करावे लागले. दुसऱ्या रूग्णालयात तनिषा भिसे यांच्यावर उपचार झाले, त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. पण, दुर्दैवी तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात हे गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते. असे असतानाही आज जी घटना घडली आहे, याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
हेही वाचा – Pune News : ‘तुमची ऐपत नसेल, तर…’, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मंगेशकर रूग्णालयावर केले गंभीर आरोप