आपल्या आजूबाजूला असलेले अनेक जण थकवा आणि रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त झालेले आपण पाहतो. तर काही लोक असे आहेत ज्यांना निद्रानाशाची समस्या भेडसावत असते. या सर्व समस्यांची कारणे आणि उपाय आपल्या अवतीभवती आहेत. आपल्याला फक्त योग्यरित्या जागरूक असणे आणि त्या उपायांचा वापर करणे आवश्यक आहे. थकवा, कंटाळा, ताण, चिंता आणि रक्तदाबातील चढउतार या समस्यांवर असाच एक सोपा उपाय आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. आणि तो उपाय म्हणजे मीठ. मीठ केवळ तुमचा थकवा दूर करत नाही तर तुम्हाला तणावापासूनही मुक्त करते. जाणून घेऊयात या मिठाचे काही आरोग्यदायी फायदे. थकवा आणि ताणतणाव यांच्यावर उपाय म्हणून कोणतेही तणावविरोधी किंवा चिंताविरोधी औषध घेण्याची गरज नाही. कारण केवळ घरगुती उपायांनीही हा तणाव दूर करता येऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी पाय मिठाच्या पाण्यात भिजवल्याने बरेच लाभ मिळू शकतात.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पाय आणि शरीराचे इतर भाग फक्त 20 मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजवल्याने त्वचेची जळजळ आणि कोरडेपणा कमी होतो. खरंतर, खारट पाण्यामुळे किंवा मिठाच्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेट होते. हायड्रेटेड त्वचेला कोरडेपणा आणि जळजळ होण्याची शक्यता कमी असते.
जर तुम्ही नुकतीच जिमला जायला सुरुवात केली असेल किंवा लांब प्रवासावरून परतला असाल तर स्नायूंना थकवा आणि वेदना नक्कीच जाणवू लागतो. मिठाचे पाणी या समस्येपासून देखील आराम देऊ शकते. मिठाच्या पाण्यात फक्त 12 मिनिटे पाय भिजवून ठेवल्याने तुम्हाला स्नायूंचा थकवा, वेदना आणि पेटके यापासून आराम मिळू शकतो.
जर तुम्हाला दिवसभराच्या काम आणि जबाबदाऱ्यांनंतर थकवा जाणवत असेल, तर केवळ मिठाच्या पाण्यात पाय बुडवून काही फायदा होणार नाही, तर तुम्हाला किमान एक तास बाथटबमध्ये बसावे लागेल. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने तुम्हाला आराम मिळेल आणि तुमचा ताणही दूर होईल.
मिठाच्या पाण्यात पाय 12 ते 20 मिनिटे बुडवून ठेवल्याने मॅग्नेशियम संतुलित होते. फायब्रोमायल्जिया असलेल्या लोकांसाठी किंवा कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या लोकांसाठी हा एक उत्तम उपाय असू शकतो. पण यासाठी सप्लिमेंट्स घेणे थांबवू नका. याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
सांधेदुखी, हाडांशी संबंधित समस्या आणि संधिवात, ऑस्टियोआर्थरायटिस सारख्या परिस्थितींमध्ये देखील मिठाचे पाणी आराम देऊ शकते.यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोमट मिठाच्या पाण्यात पाय बुडवून शेक घ्या.
जर तुम्हालाही ताणतणाव, थकवा, त्वचेची सूज, कोरडेपणा किंवा सांधेदुखीचा सामना करावा लागत असेल, तर मिठाच्या पाण्याने पाय धुणे, पाय ठरावीक काळासाठी बुडवून ठेवणे आणि बाथटबमध्ये मिठाचे पाणी वापरणे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकते.
हेही वाचा : Beauty Tips : तिखट मिरचीचे ब्युटी कनेक्शन
संपादित – तनवी गुडे