प्रवीण जाधव
सातारा : साताऱ्यात आयटी पार्क सुरू करण्यासाठी नागेवाडी (ता. सातारा) येथील ४२ हेक्टर जमीन देण्याबाबतचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीमध्ये झाला आहे. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाने प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आयटी पार्क सुरू होण्याच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या उच्चशिक्षित युवक व त्यांच्या पालकांच्या अपेक्षेला मूर्त स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. सातारकरांची ही अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उद्योगमंत्री व लोकप्रतिनिधींनी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, अशी जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सातारा हा पुण्यापासून जवळ असलेले व महामार्ग, तसेच रेल्वेची कनेक्टिव्हिटी असलेला जिल्हा; परंतु राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्याचा औद्योगिक विकास झाला नाही. सातारा शहर तर त्याबाबतीत मागेच राहिले. केवळ कूपर उद्योग समूहामुळे येथील काही युवकांना चांगले रोजगार उपलब्ध होत आहेत. साताऱ्यानंतर सुरू झालेल्या शिरवळ, खंडाळा व फलटण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग आले; परंतु अन्य तालुके मागेच राहिले आहेत. औद्योगिक सुधारणा नसल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश युवकांना नोकरीसाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अनेक युवकांनी आयटी हबमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये शिकली आहेत; परंतु साताऱ्यात नोकरीची संधी नसल्याने त्यांना पुणे, बंगळूर, हैदराबाद अशा शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागले आहे. युवकांची हीच नस पकडून लोकप्रतिनिधींनीही आयटी पार्क सुरू करण्याची स्वप्ने गेल्या अनेक वर्षांपासून दाखविली आहेत. मात्र, ही स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याला सुरुवात होत नव्हती.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या निवडणुकीदरम्यान अनेकदा आयटी पार्क करण्याचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरूही आहेत; परंतु बरीच वर्षे लोटल्याने आयटी पार्क हा सातारकरांच्या दृष्टीने तसा चेष्टेचा विषय बनला होता; परंतु या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. उदयनराजे यांनी सुरुवातीपासून गोडोली येथील पशुसंवर्धन विभागाची जागा निवडली होती. हा १६ एकरांचा परिसर ताब्यात घेण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत. याबरोबरच दुसरी मोठी घडामोड या संदर्भात नुकतीच झाली आहे.
२३ मार्चला उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुंबई येथे एक बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत साताऱ्यामध्ये आयटी हब उभारण्याबाबत चर्चा झाली. आयटी कंपन्या साताऱ्यात येण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांसह जमीन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार नागेवाडी येथील शासनाची ४२ हेक्टर जमीन त्यासाठी देण्यावर एकमत झाले. औद्योगिक विकास महामंडळाकडून त्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून लवकरच स्थळ पाहणी होणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई येथील पथक साताऱ्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
प्रादेशिक कार्यालयानंतर कामांना वेग
साताऱ्यात औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय नव्हते. त्यामुळे महत्त्वाच्या सर्व कामासाठी उद्योजक व नागरिकांना कोल्हापूरला जावे लागत होते. राज्य शासनाने गेल्या वर्षी सात नवीन प्रादेशिक कार्यालयाची स्थापना केली. त्याअंतर्गत सातारा येथे नव्याने प्रादेशिक कार्यालय ४ सप्टेंबर २०२४ पासून कार्यरत झाले. त्यामुळे उद्योजकांना तत्काळ सुविधा मिळण्याबरोबरच भूखंड संपादन, वाटप या प्रक्रिया जलद झाल्या आहेत. कार्यालयाने खंडाळा टप्पा क्र. ३ औद्योगिक क्षेत्रातील शिवाजीनगर व भादे येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित ११९ हेक्टरचा ताबा घेतला, तसेच अतिरिक्त खंडाळा टप्पा-३ मधील भादे येथील १९६ हेक्टरचा ताबा मिळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हे क्षेत्र महामंडळास प्राप्त होणार आहे. म्हसवड येथील केंद्र-राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी बीएमआयसी योजनेंतर्गत सुमारे १००० हेक्टर मोजणीही पूर्ण झाली आहे.