पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची अलौकिक शौर्यगाथा उलगडणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ या अनोख्या कार्यक्रमाच्या प्रयोगांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कार्यक्रमाच्या प्रयोगांना शनिवारपासून (ता. ५) प्रारंभ होत आहे.
या कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील प्रयोग पाच एप्रिल ते २७ एप्रिल कालावधीत प्रत्येक शनिवार-रविवारी सकाळी ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहेत. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रांका ज्वेलर्स असून, सहप्रायोजक रावेतकर ग्रुप आहे.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे फायनान्स पार्टनर असून, द नेचर-मुकाईवाडी, व्हीटीपी रिॲलिटी आणि शिवसृष्टी थीम पार्क सहयोगी प्रायोजक आहेत. ‘गोष्ट इथे संपत नाही’ सादर करणाऱ्या सारंग भोईरकर व सारंग मांडके यांनी कार्यक्रमानिमित्त गुरुवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देत संवाद साधला.
याप्रसंगी रांका ज्वेलर्सचे संचालक डॉ. रमेश रांका आणि अनिल रांका, रावेतकर ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, द नेचर-मुकाईवाडीच्या संचालक वैशाली देशमुख, व्हीटीपी रिॲलिटीचे व्यवस्थापक हिरचना पांड्या, उपमहाव्यवस्थापक बिदीशा सरकार आदी उपस्थित होते.
मांडके आणि भोईरकर म्हणाले, ‘गोष्ट इथे संपत नाही-शिवचरित्र’ कार्यक्रमातील आठही प्रयोग एकापाठोपाठ ऐकणे, ही इतिहासप्रेमी रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हिंदवी स्वराज्य कसे निर्माण झाले, कसे वाढले आणि कसे टिकले, याचा संपूर्ण पट कार्यक्रमातून उलगडेल.’
आपण इतिहास पुस्तकांमधून वाचला आहे. आता चित्रपटांमध्येही पाहतो आहे. ‘गोष्ट इथे संपत नाही’च्या माध्यमातून सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांनी नावीन्यपूर्ण मांडणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण पैलू समोर आणण्याचे महत्त्वाचे काम कार्यक्रमाद्वारे होत आहे.
- डॉ. रमेश रांका, संचालक, रांका ज्वेलर्स
आपला गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा जपण्यासाठी अन् पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळेच ‘गोष्ट इथे संपत नाही’सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे काम करणाऱ्या मांडके आणि भोईरकर यांना पाठबळ देण्याची आमची भूमिका आहे.
- अनिल रांका, संचालक, रांका ज्वेलर्स
आपण पाठ्यपुस्तकांमधून इतिहास वाचला; पण पुरेशा तीव्रतेने तो आपल्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही. त्यामुळे आपल्या पिढीपर्यंत पोहोचला नसला; तरी पुढच्या पिढीपर्यंत मात्र तो पोहोचावा. त्यातून त्यांना काहीतरी शिकायला मिळावे, या उद्देशातून आम्ही ‘गोष्ट इथे संपत नाही’ कार्यक्रमाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. अभ्यासपूर्ण, साधी मांडणी आणि प्रभावी सादरीकरण, हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
- अमोल रावेतकर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, रावेतकर ग्रुप
तिकिटांविषयी
कार्यक्रम सशुल्क असून, यासाठी सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठीचे वैयक्तिक तिकीट उपलब्ध आहे. कार्यक्रमाची तिकीट विक्री ‘बुक माय शो’ संकेतस्थळावर सुरू असून, बालगंधर्व रंगमंदिरातही तिकिटे उपलब्ध आहेत.