इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या सुरू असतानाच १० एप्रिलला मोठी बातमी समोर आली. चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे.
त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद पुन्हा एकदा एमएस धोनी सांभाळताना दिसणार आहे.
दरम्यान, ऋतुराजला डाव्या हाताच्या कोपराला छोटे फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याला या हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे.
पण अनेकांना त्याला ही दुखापत कधी झाली, हे माहित नसेल.
३० मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सचा सामना गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध झाला होता, याच सामन्यात ऋतुराजला ही दुखापत झाली.
या सामन्यात चेन्नईकडून ऋतुराज फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे गोलंदाजी करत होता.
तुषारच्या तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याच्या अपेक्षेपेक्षा चेंडू धीम्यागतीने आता आणि त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला जोरात लागला.
त्याक्षणी ऋतुराजला वेदना असह्य झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याला त्यावेळी फिजिओने पेन रिलीफ स्प्रे मारून पेन किलर गोळीही दिली होती. त्यानंतर ऋतुराजने अर्धशतक साकारले.
या सामन्यानंतरही ऋतुराजने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स विरुद्ध देखील खेळला, पण त्याला ५ आणि १ धावच करता आली.
दरम्यान, त्याच्या कोपारचे एमआरआयचे रिपोर्ट्स समोर आल्यानंतर त्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला.
ऋतुराजने आयपीएल २०२५ मध्ये ५ सामन्यात खेळताना दोन अर्धशतकांसह १२२ धावा केल्या होत्या.