Virat Kohli Record: बाऊंड्री मारण्यातही विराटच 'किंग'! IPL मध्ये 'हा' विक्रम करणारा बनला पहिलाच खेळाडू
esakal April 11, 2025 08:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुरुवारी (१० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्सने पराभूत केले. बंगळुरूचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा पराभव आहे. या सामन्यात बंगळुरूला पराभवाचा सामना जरी करावा लागला, तरी या सामन्यात बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीने वैयक्तिक एक मोठा विक्रम केला आहे.

या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांना चांगल्या सुरुवातीनंतर २० षटकात ७ बाद १६३ धावाच करता आल्या. सुरुवातीला सलामीवीर फिल सॉल्टने १७ चेंडूतच ३७ धावांची खेळी केली. तसेच शेवटी टीम डेव्हिडने २० चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी केली.

मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नाही. सलामीला खेळताना १४ चेंडूत २२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक चौकार दोन षटकार मारले.

पण विराटने मारलेल्या या तीन बाऊंड्रीमुळे त्याने खास विक्रम केला आहे. विराटच्या आता १००० बाऊंड्री झाल्या आहेत. तो आयपीएलमध्ये १००० बाऊंड्री मारणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत २५७ आयपीएल सामन्यांमध्ये १००१ बाऊंड्री मारल्या आहेत. यामध्ये त्याच्या ७२१ चौकार आणि २८० षटकारांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटपाठोपा शिखर धवन आहे. त्याने ९२० बाऊंड्री मारल्या आहेत. विराट आणि शिखर या दोघांनीच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९०० बाऊंड्रीचा टप्पा पार केलेला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक बाऊंड्री मारणारे फलंदाज (१० एप्रिल २०२५ पर्यंत)
  • १००१ बाऊंड्री - विराट कोहली

  • ९२० बाऊंड्री - शिखर धवन

  • ८९९ बाऊंड्री - डेव्हिड वॉर्नर

  • ८८५ बाऊंड्री - रोहित शर्मा

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. त्याने २५७ सामन्यांमध्ये ८१९० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ८ शतकांच्या आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्लीचा विजय

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यांबद्दल सांगायचे झाले, तर बंगळुरूने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्यचा पाठलाग दिल्लीने १७.५ षटकात ४ विकेट्स गमावत १६९ धावा करून पूर्ण केल्या. दिल्लीकडून केएल राहुलने ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ९३ धावांची खेळी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.