नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळीच दाखल न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. आधी १० लाख भरा मगच उपचार करु असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
एका महिलेचा मृत्यूनंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. योग्यरित्या अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. समितीचे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत ऑडिट रिपोर्ट चौकशी केल्यानंतर सादर करणार आहेत
श्रीमती तनिशा सुशांत भिसे या दिनानाथ मंगेशकर , पुणे येथे प्रसुतीसाठी आल्या असता त्यांना अॅडमिशनसाठी १० लाखाची मागणी केली व त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यानंतर सदर पेशंट मनिपाल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्या आहेत.
सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खालील प्रमाणे चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.
१) डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडल, पुणे अध्यक्ष
२) डॉ. प्रशांत वाडीकर, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुगे सदस्य
३) डॉ. नागनाथ यम्पल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय औंध, पुणे -सदस्य
४) डॉ. निना बोराडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालीका, पुणे सदस्य
५) डॉ. कल्पना कांबळे, वैद्यद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे सदस्य
तरी सदर प्रकरणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे व मनिपाल हॉसिपटल, पुणे येथे भेट देऊन सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व आवश्यक त्या दस्तऐवजासह तात्काळ या कार्यालयास सादर करावा.