पुणे : ‘‘राज्यात बनावट माथाडी कामगारांचा भरणा झाला असून, या बनावट कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे,’’ असा इशारा राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला. राज्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये बनावट माथाडी कामगारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह सर्वच प्रमुख शहरांच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये हा प्रश्न आहे. या बनावट माथाडी कामगारांमुळे उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, त्याविरोधात अनेक तक्रारी येत असतात. या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी वरील इशारा दिला आहे.
फुंडकर म्हणाले, ‘‘माथाडींच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यात मोठ्या प्रमाणात आले आहेत. आता त्यामुळे खरे माथाडी कामगार लाभापासून वंचित राहत आहेत. या सर्व कामगारांचे ‘ऑडिट’ करण्यात येणार आहे. तसेच राज्यात ३६ माथाडी मंडळे असून, या मंडळांची फेररचना करण्यात येणार आहे. तसेच, या मंडळांचा कालावधी तीनऐवजी पाच वर्षांचा करण्यात आला आहे. त्यावरील आक्षेपांवर निर्णय घेऊन ही फेररचना करण्यात येणार आहे.’’
देशातील पहिले बॉयलर पोर्टल तयारकामगारांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन सुविधा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांची सोय झाली आहे. राज्यातील बॉयलर विभाग आशिया खंडात पहिल्या क्रमांकाचा आहे. बॉयलर उद्योगाशी संबंधित छोट्या गोष्टींसाठी विभागाकडे फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे कमीत कमी वेळात परवानगी मिळावी आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी देशातील पहिले बॉयलर पोर्टल तयार करण्यात आले आहे, असेही फुंडकर यांनी नमूद केले.