Pregnant Woman Death : दीनानाथप्रकरणी चौकशीसाठी समिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा; गर्भवतीच्या मृत्यूची सरकारकडून दखल
esakal April 05, 2025 12:45 PM

मुंबई : उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू होण्याच्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून जे.जे. रुग्णालयाच्या अधीक्षकांचा समावेश असलेली धर्मादाय विभागीय आयुक्तांची समिती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आली आहे.

धर्मादाय सहआयुक्त, पुणे

यांच्या अध्यक्षतेतील या चौकशी समितीत ये उपसचिव यमुना जाधव, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक हे सदस्य आहेत. तर विधी व न्याय विभागाचे उपसचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

‘चौकशीनंतर कारवाई’

पुणे : ‘‘सर्वसामान्यांना उपचार घेण्याचा अधिकार आहे. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात काय चूक झाली? हे सरकार तपासणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी चूक केली असेल; तर चुकीला माफी नाही. सरकार रुग्णालयावर कारवाई करेल,’’ असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

अजित पवारांचे चौकशीचे आदेश

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. या कथित घटनेचीही शासनाने गंभीर दखल घेतली असून याची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती घेऊन आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शकपणे चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.विविध

संघटना, राजकीय पक्षांची आंदोलने

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी शुक्रवारी रुग्णालय, धर्मादाय कार्यालयात शुक्रवारी आंदोलने करत निषेध व्यक्त केला. भाजप महिला मोर्चा, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेसने सहभाग घेतला.

जुळ्यांवरील उपचाराच्या खर्चाची नातेवाइकांना कल्पना दिली होती

तनिषा भिसे यांची सातव्या महिन्यात प्रसूती होणार होती. जुळ्या मुलांचे वजन कमी असल्याने त्यांना दोन ते अडीच महिने नवजात शिशू कक्षात उपचार घ्यावे लागणार होते. त्यासाठी १० ते २० लाख रुपये खर्च येण्याची कल्पना नातेवाइकांना दिल्याचा अहवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने शासनाला सादर केला आहे.

त्यावर दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर व इतर सदस्यांसह चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या अहवालानुसार रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी तनिषा यांना २८ मार्चला बाह्यरुग्ण विभागात तपासले. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती, परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता निगराणी करण्याच्या हेतूने भरती होण्याचा सल्ला दिला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.