कु. सरोज चंदनवाले
नअस्कार! मधुचंद्राचं आणि मराठी साहित्याचं काय नातं असावं? असा गहन प्रश्न माझ्या अलवार, आणि कोमल मनाला पडला आहे. एका हातात वारुणीचा चषक, दुज्या हातात चोपडं आणि प्रियेच्या अंकावर मस्तक ठेवून वाचनानंदात बुडून गेलेला प्रियकर…हे चित्र उमर खय्यामच्या एखाद्या रुबाईतलं वाटतं, यात शंका नाही. पण…पण…ती तर एक कविकल्पना आहे. एरवी मधुचंद्रासाठी (पीएल टाकून, ट्रावल अलावन्स घेऊन) गेलेला कुठला नवपरिणीत प्रियतम बुके वाचण्यात वेळ घालवेल?
तरीही आजकाल जमाना बदलला आहे. मराठी भाषेच्या प्रसारासाठी कुठे कुठे जावं लागेल, याची काही ग्यारंटी उरली नाही. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्लीवारी झाली, आता त्यापलिकडे काश्मीरलाही जावं लागणार आहे. ‘काश्मीरला जाऊन काय पाहिलं?’ या प्रश्नावर एखादी नवपरिणीता लाजत लाजत ‘दोन कादंबऱ्या वाचून काढल्या’ असं उत्तर ज्या दिवशी देईल, त्यादिवशी वाचनसंस्कृती रुजली, असं जाहीर करायला हरकत नाही. आजवर आपल्याकडे काही अज्ञ युवक-युवती मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याचे बेत करुन महाबळेश्वरी जाऊन येत असत. पण रा. विनोदवीर तावडेनामक एका अरसिक वृत्तीच्या गृहस्थानं महाबळेश्वराच्या खोऱ्यात भिलारला पुस्तकांचं गाव वसवलं.
आता हे कमी पडलं म्हणून की काय कुणास ठाऊक, मधुचंद्राचं आणखी एक लोकप्रिय ठिकाण पुस्तकांनी गजबजणार आहे. यावेळी या कारस्थानाला जबाबदार विनोदवीर तावडेजी नव्हे, तर उदयजी सामंत आहेत. यांना हे नसते उद्योग सांगतो कोण बरं? यावेळी माथेरान, महाबळेश्वर वगैरे देशी मामला नाही. थेट काश्मीरवर स्वारी आहे. होय, काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात आरागाम नावाचं एक निसर्गसौंदर्यानं विनटलेलं गाव आहे. तिथं आता पुस्तकांचा गाव उभा राहातोय.
महाबळेश्र्वर काय, किंवा काश्मीर काय, दोन्हीकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. हौसबोटीची हौस, चिनारवृक्ष, गुलमर्गला घोड्यावर बसणे, दाल लेकमध्ये शिकाऱ्यात बसून ‘त्तारीऽऽफ करुऽऽ क्या उसकीऽऽ…’ हे गाणं शम्मी कपूर मेथडने आळोखेपिळोखे देत म्हणताना फोटो काढून घेणे, निशात बागेत काश्मिरी ड्रेसमध्ये फोटो काढून घेणे, आक्रोड फोडण्याचा अडकित्ता विनाकारण खरेदी करणे, केशराची डबी विकत घेणे, काश्मिरात मिळणारी सफरचंदे मंडईतल्या सारखीच असतात, हा नवा शोध लावणे अशा कितीतरी गोष्टी पार पाडल्यानंतरही पर्यटकांकडे भरपूर वेळ उरतोच. काश्मीरात आक्रोड खातात, महाबळेश्वरी भाजके शेंगदाणे आणि शेंदरी गाजरं…येवढाच फरक! मराठी पर्यटकांना एकवेळ टूथपेस्ट नाही मिळाली तरी चालेल, पण पुस्तक हवंच, हा गैरसमज का पसरला असेल? हे काही कळायला मार्ग नाही…
सबब, मराठी भाषा विकास विभाग, काश्मीर सरकार आणि याउप्पर ‘सरहद’ ही पुण्यातली काश्मिरी स्वयंसेवी संस्था या तिघांच्या विद्यमाने वुलर तलावाच्या परिसरातल्या आरागाम या गावी पुस्तकांचा गाव वसवला जातोय, अशी बातमी आहे. ‘बंदुका फेका, बुके घ्या’ हा नवा संदेश घेऊन मराठी पुस्तके काश्मीर खोऱ्यात निघाली आहेत. इथं फक्त मराठी नव्हे तर हिंदी, मराठी, काश्मिरी, ऊर्दू, बंगाली, आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकंही उपलब्ध असणार आहेत म्हणे.
सरहद संस्थेचे सर्वेसर्वा संजयजी नहार यांनी आरागामच्या निसर्गरम्य गावात पुस्तकं मांडण्याची धावपळ एव्हाना सुरु केली आहे. सहा महिन्यापूर्वी मी याच सदरातून इशारा दिला होता की, या पुणेरी गृहस्थांस वेळीच आवरा! त्यांनी साहित्य संमेलन दिल्लीत नेलं, हे एकवेळ ठीक आहे, पण आता मराठी पुस्तकं काश्मिरात पोचवण्यासा खटाटोप सुरु केला आहे. एखाद्यामध्ये किती उत्साह असावा, याला काही लिमिट?