परीक्षा जवळ आल्यावर...
esakal April 05, 2025 01:45 PM

राजीव तांबे

शाळेत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं, की घरातलं वातावरण बदलतं. ‘आता अभ्यासाला लागण्याचे’ म्हणजे परीक्षेची तयारी करण्याचे प्रत्येक घराचे वेगवेगळे फंडे असतात, काही गोष्टी कॉमन असतात. यातील सर्वांत पालकप्रिय म्हणजे, ‘आजपासून परीक्षा संपेपर्यंत टीव्ही बंद’ कारण टीव्ही पाहिल्याने अभ्यासाची वाट लागते.

दुसरा मुद्दा, ‘आता खेळ बंद.’ परीक्षा झाल्यावर पाहिजे तितकं खेळा; पण आत्ता नाही. आता फक्त मान मोडून अभ्यास करायचा. तिसरा मुद्दा, ‘आता सगळे क्लास बंद.’ म्हणजे नाच, गाणं, संगीत, वाद्यं आणि व्यायामशाळा याची आता काही गरज नाही- कारण आता परीक्षा जवळ आली आहे.

चौथा खतरनाक मुद्दा, ‘आता मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत अजिबात टाइमपास करायचा नाही. नो चॅटिंग. वेळ अमूल्य आहे- कारण परीक्षा जवळ आली आहे. तुमच्याही घरात असा हा ‘चार कलमी’ कार्यक्रम असेल, तर जरा नव्यानं विचार करा. प्रथम आपण या चार कलमांतला फोलपणा समजून घेऊ.

पहिली गोष्ट, टीव्ही बंद करून मुलांचे मार्क वाढत नाहीत. एक लक्षात घ्या, कुठल्याही वस्तूला विरोध करून किंवा त्यावर बंदी घालून अपेक्षित यश मिळत नाही.

तर.. त्या गोष्टीचा जबाबदारीनं वापर करूनच मार्ग मिळू शकतो. यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे, घरातल्या सर्वांनी मिळून टीव्ही केव्हा पाहायचा आणि किती वेळ पाहायचा? याचं वेळापत्रक करायचं आणि ते कठोरपणे पाळायचं. मुलांना अभ्यासासोबत मनोरंजनाचीही तेवढीच गरज असते हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांच्या मनावरचा अभ्यासाचा ताण थोडा कमी होऊ शकतो.

आता अजिबात खेळू नका, असं करणं योग्य नाही. खेळ ही मुलांची गरज आहे. परीक्षा जवळ आल्याने खेळाचा वेळ कमी करता येऊ शकेल. मुलाला नेहमीच खेळायची सवय असेल, तर त्याला थोडा वेळ खेळायला देणं गरजेचं असतं. खेळाच्या माध्यमातून साचलेली शक्ती मोकळी होण्यास मदत होते.

नाच, संगीत, वाद्यं किंवा व्यायामशाळा यांचे क्लासेस म्हणजे ‘वेळ फुकट घालवण्याची ठिकाणं’ असा कधीही विचार करू नका. ही मुलांची नुसती आवडच नाही, तर ती त्यांची पॅशनही असते. त्यांना मनापासून आवडणारी ती गोष्ट असते. खरंतर तिथं जाण्याची त्यांना आस असते हे समजून घ्या. इथून मुलं जेव्हा परत येतात, तेव्हा ती रिचार्ज झालेली असतात. त्यामुळे मुलांच्या आवडीचे आणि छंदाचे क्लास परीक्षा जवळ आली म्हणून बंद करणं म्हणजे मुलांचा ऑक्सिजनच बंद करण्यासारखं होईल.

मित्र-मैत्रिणींसोबतच्या गप्पांना सकारात्मक वळण देता येईल. आपण आपल्या मुलाच्या, मुलीच्या मित्र-मैत्रिणींना आवर्जून घरी बोलवावं. त्यांना आवडेल असा खाण्याचा पदार्थ करावा आणि यातूनच ‘अभ्यास गप्पांना’ चालना द्यावी. अभ्यासातील एकमेकांच्या अडचणी एकमेकांच्या मदतीनं कशा सोडवता येतील? सगळ्यांनी मिळून पुढे जाण्याचा मार्ग कसा शोधता येईल हे शोधण्यासाठी त्यांना प्रेरित करता येईल.

‘जे नकोला ‘नको’ म्हणतात त्यांनाच हवं ते मिळतं’ ही हुनान प्रांतातली चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.