मुंबई : देशभक्तिपर चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवत ‘भारतकुमार’ अशी उपाधी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार (वय ८७) यांचे गुरुवारी पहाटे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. अभिनेते मनोजकुमार यांनी आपल्या चित्रपटातून विविध ज्वलंत समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ५) विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हृदयविकाराच्या तक्रारी आणि यकृताच्या समस्यांमुळे मनोजकुमार गेले काही काळ आजारी होते. त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या अबोटाबाद येथे मनोजकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय दिल्लीला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ चित्रपटाबरोबरच हिमालय की गोद में (१९६५), गुमनाम (१९६५), उपकार (१९६७), पत्थर के सनम (१९६७) पूरब और पश्चिम (१९७०), बेईमान (१९७२), शोर (१९७२), रोटी, कपडा और मकान (१९७४), संन्यासी (१९७५), क्रांती (१९८१) असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांचे ते निस्सीम चाहते होते. दिलीप कुमार यांचा ‘शबनम’ हा चित्रपट त्यांनी पाहिला आणि तेव्हाच त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
'शबनम’ चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. त्यामुळे त्यांनी आपले नाव मनोजकुमार असेच ठेवले. देशभक्तिपर चित्रपटांची अधिक निर्मिती केल्याने त्यांना ‘भारतकुमार’ ही उपाधी देण्यात आली आणि त्यानंतर ते भारतकुमार म्हणूनही प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील जया भादुरी, हेमामालिनी, वहिदा रेहमान, आशा पारेख, वैजयंती माला अशा आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केले. ‘उपकार’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट कमालीचा सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदानासाठी त्यांना १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले, तर २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.