रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जारी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता १० आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटांबाबत मोठी अपडेट दिलीय. महात्मा गांधी (नवीन) सीरिजमधील १० आणि ५०० रुपयांच्या नोटा जारी करण्यात येणार आहेत. यात एक बदलही असणार आहे.
नव्या १० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. या नोटांची रचना नव्या सीरिजमधील इतर नोटांसाऱखीच असणार आहे. तसंच याआधी जारी केलेल्या १० रुपयांच्या सर्व नोटा चलनात राहतील. याशिवाय ५०० रुपयांच्या नोटाही चलनात कायम राहणार असल्याचं आरबीआयने सांगितलंय.
आरबीआयने महिन्याभरापूर्वी १०० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याची घोषणा केली होती. यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असेल. संजय मल्होत्रा यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाची सूत्रे हाती घेतली. पुढच्या तीन वर्षांसाठी ते गव्हर्नर असणार आहेत.
नव्या ५०० रुपयांच्या नोटांमध्ये रंग, आकार, त्याची थीम आणि सुरक्षा कोड आणि डिझाइन असे अनेक बदल आहेत. ग्रे कलरच्या या नोटा असून नवी थीम भारतीय वारसा स्थळ लाल किल्ला अशी आहे.