सातारा : साताऱ्यात आयटी पार्क निश्चित होणार असून, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुचविलेल्या जागांपैकी एका जागेवर नागेवाडी (ता. सातारा) येथे आयटी पार्क (IT Park) व दुसऱ्या जागेवर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल. महसूल विभागाच्या आधिपत्याखालील या जागा एमआयडीसीकडे मोफत हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश उद्योगमंत्री (Uday Samant) यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय, म्हसवड येथे होणाऱ्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी (NICDC) भूसंपादनाच्या प्रक्रियेलाही त्यांनी हिरवा कंदील दाखविला. साताऱ्यात ४८५ हेक्टरवर होणाऱ्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शेतकरी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा करून मार्ग काढावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
श्री. सामंत यांनी मास भवनात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, मुख्य अभियंता नितीन वानखंडे, विभागीय अधिकारी डॉ. अमितकुमार सोडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, प्रांताधिकारी राहुल बारकुल, उज्ज्वला गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कार्यकारी अभियंता लिराप्पा नाईक, उपअभियंता लहू कसबे, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेश दंडगव्हाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘साताऱ्यातील आयटी पार्कसंदर्भात आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक झालेली आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन स्वतंत्र जागा सुचविल्या आहेत. यापैकी नागेवाडी (ता. सातारा) येथील जागा प्रशस्त असून, ती शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेवरच आयटी पार्क विकसित केला जाईल, तसेच उदयनराजेंनी सुचविलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारले जाईल.
त्यामुळे महसूल विभागाने या जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, अशी सूचना त्यांनी केली. साताऱ्यात अतिरिक्त औद्योगिक वसाहत होणार असून, या वसाहतीसाठी ४५८ हेक्टर क्षेत्र वापरले जाणार आहे. त्यासाठी वर्णे, जाधववाडी आणि निगडी या गावांच्या परिसरातही अतिरिक्त वसाहत होणार आहे. या वाढीव वसाहतीसाठी भूसंपादन करताना सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा करावी. एमआयडीसीकडून जास्तीतजास्त दर देऊन भूसंपादन केले जाणार आहे.
‘प्रोत्साहन’ची थकबाकी देणारउद्योगांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या योजनेतील थकीत रक्कम लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन औद्योगिक धोरण येत्या १५ दिवसांत जाहीर करण्यात येईल, तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...पशुसंवर्धन विभागाच्या जागेवर होणार कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र
म्हसवड येथे होणाऱ्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना
अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी वर्णे, जाधववाडी, निगडी परिसरातील ४५८ हेक्टर क्षेत्र वापरणार
वाढीव वसाहतीसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे.
म्हसवड येथे तीन हजार हेक्टरवर केंद्र सरकारतर्फे इंडस्ट्रियल कॉरिडॉर (एनआयसीडीसी) होत आहे. त्याचे नोटिफिकेशन निघाले असून, आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. भूसंपादन करताना शेतकरी तसेच स्थानिकांना विश्वासात घ्यावे व चर्चा करून निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.