Hardik Pandya throws his bat in frustration : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरंच काही घडलं. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला ५ बाद १९१ धावा करता आल्या. विजयासाठी ७ चेंडूंत २४ धावा हव्या असताना तिलक वर्माचे अचानक रिटायर्ड आऊट होण्याचा सर्वांना धक्का बसला. डग आऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादवलाही काहीच कळेनासे झाले होते. त्यात सामन्यानंतर हार्दिक पांड्याने केलेली कृती त्याला शिक्षा मिळवून देऊ शकते.
काल लखनऊ येथे झालेल्या सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळला नाही. पण, त्याच्या डावपेचाच्या जोरावर मुंबईच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. विशेषतः हार्दिकने पाच विकेट्स घेतल्या. मात्र, मिचेल मार्श ( ६०), एडन मार्करम ( ५३) यांच्या खेळीने लखनऊला २०३ धावांपर्यंत पोहोचवले. आयुष बदोनी ( ३०) व डेव्हिड मिलर ( २७) यांनी चांगला हातभार लावला.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. नमन धीर ( ४६) व सूर्यकुमार यादव ( ६७) यांनी दमदार खेळ करून मुंबईला विजयाच्या वाटेवर आणले होते. नमनची विकेट दिग्वेश राठीने घेतली आणि संघावर दडपण आले. सूर्या मैदानावर असेपर्यंत आशा होत्या. हार्दिक व तिलक वर्मा यांना मॅच संपवता आली असती, परंतु ७ चेंडूंत २४ धावा हव्या असताना तिलकने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला.
तिलकला माघारी बोलावण्याचा निर्णय कोच माहेला जयवर्धनेचा होता. हे सामन्यानंतर स्पष्ट झाले. तिलक २५ धावांवर रिटायर्ड आऊट झाला, तर कर्णधार हार्दिकने १६ चेंडूंत नाबाद २८ धावा केल्या. मुंबईला ५ बाद १९१ धावाच करता आल्या आणि लखनऊने सामना जिंकला.
हार्दिकने २०व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यामुळे ४ चेंडूंत १६ धावा मुंबईला हव्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेता आली असती, परंतु हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. त्यानंतर पुढील तीन चेंडूवर हार्दिकला विजय साकारता आला नाही. त्यानंतर हार्दिकने बॅट फेकून नाराजी व्यक्त केली. त्याच्या या कृतीवर बीसीसीआय आता काय कारवाई करते, हे पाहावे लागणार आहे.