"बंद करा" एकीकडे कीर्तन तर दुसरीकडे रोमान्स; सावळ्याची जणू सावली मालिकेच्या बोल्ड प्रोमोवर प्रेक्षक भडकले
esakal April 05, 2025 10:45 PM

Marathi Entertainment News : मराठी मालिकांमधील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. त्यातीलच एक चर्चेत राहणारी मालिका म्हणजे झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली. काळ्या वर्णामुळे सतत अपमानास्पद वागणूक मिळणारी सावली आणि तिचा नवरा सारंग ही गोष्ट या मालिकेत पाहायला मिळतेय. मालिकेचा रामनवमी विशेष प्रोमो नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आला ज्याच्यावर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

सारंगशी जिचं लग्न ठरलं होतं ती अस्मि आता सारंगच्या आयुष्यात परत आलीये. काहीही करून सारंग आणि सावलीमध्ये दुरावा आणून त्याला आपल्याजवळ आणण्याचे प्रयत्न अस्मि करतेय. त्यात ऐश्वर्या आणि तिलोत्तमाचीही तिला साथ आहे. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, मेहेंदळेंच्या घरी रामनवमीनिमित्त सखदेवचं कीर्तन आयोजित केलं असतं. सखदेव त्याच्या कीर्तनातून रामाच्या मर्यादा पुरषोत्तम गुणाचं वर्णन करत असतो. तर इकडे सारंग खोलीत येतो तेव्हा अस्मि फक्त टॉवेल गुंडाळून त्याच्या समोर येते. तो तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो आपण ती सतत स्वतःजवळ त्याला खेचते. इकडे सावली सारंगवरचा तिचा विश्वास व्यक्त करते आणि सारंगचं पाऊल चुकीचं पडू नये म्हणून विठ्ठलाजवळ प्रार्थना करते.

मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. "हिंदू धर्माच्या सणांचं महत्त्व जप. सिरियलचा टीआरपी वाढवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका. चांगली स्क्रिप्ट नसेल तर सिरीयल बंद करा. कोणाचं काही अडत नाही.","विठ्ठलाची सिरीयल दाखवत आहात आणि रामनवमी भजन चालू आहे आणि हे काय फालतूपणा दाखवत आहात. फालतू सिरीयल झाली आहे. बंद करा सिरीयल."," मराठी घरगुती मालिका वा छान....हेच दाखवत जावा" अशा कमेंट्समधून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलाय.

सारंग सावलीचा विश्वास सार्थ ठरवेल का ? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा सावळ्याची जणू सावली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.