भंगार चोरांचा सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला
esakal April 05, 2025 10:45 PM

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : तुर्भे येथील कस्टमच्या जुन्या मालाच्या परिसरात घुसलेल्या दोघा भंगार चोरांना सुरक्षारक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याने एका भंगार चोराने एका सुरक्षारक्षकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सुरक्षारक्षक संदीप भोसले व त्यांचे सहकारी इकलाक अहमद भट्टी (४७) हे दोघेही बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तुर्भे सेक्टर २०मधील सीडब्ल्यूसी गोडाऊन भागात पेट्रोलिंग करण्यासाठी गेले होते. दोघेही गोडाऊन क्र. १४च्या मागे असलेल्या कस्टमच्या जुन्या मालाच्या परिसरात गेले असताना, तेथील एका कंटेनरमधून अचानक हिलाल रैफ शेख (२९) व सागर देवीदास सूर्यवंशी (१९) हे दोघे बाहेर आले. दोघेही भंगार चोर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघांनी तेथून पळ काढल्याने त्यांचा पाठलाग केला. या वेळी हिलाल शेख याला इकलाक भट्टी यांनी पकडल्यानंतर शेखने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी त्याच्याजवळ असलेला धारदार चाकू इकलाक भट्टी यांच्या पोटात भोसकून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोघा चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरट्यांच्या हल्ल्यात इकलाक भट्टी गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर संदीप भोसले यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इकलाक भट्टी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
--------------
गुप्त बातमीदारांची मदत
घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचे एपीएमसी पोलिसांसमोर आव्हान होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिवूरकर व त्यांच्या पथकाने या गुन्ह्यातील आरोपींची कुठल्याही प्रकारची माहिती नसताना गुप्त बातमीदाराकडून आरोपींची माहिती मिळवून त्यांना एपीएमसीतील ग्रीन पार्क झोपडपट्टीतून अटक केली आहे. जखमी सुरक्षारक्षक इकलाक भट्टी हे माजी सैनिक असून त्यांच्यावर मिलिटरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.