एआय़च्या मदतीने फोटो, व्हिडीओ तयार करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. आता इतिहासात एखादं शहर, गाव कसं दिसत असेल त्याबाबत प्रॉम्प्ट देऊन एआय़कडून फोटो तयार करून घेतले जात आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एआयच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा क्षण कसा असेल याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. रायगडावर ३५० वर्षांपूर्वी झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचा एआयच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला मराठा साम्राज्यासह देशविदेशातील काही मंडळीही उपस्थित होते. यात इंग्रज अधिकारी असलेला हेन्री ऑक्सेंडन हासुद्धा होता. त्यानं रायगडावर झालेल्या सोहळ्याचं वर्णन त्याच्या डायरीत सविस्तर लिहून ठेवलंय. याच्याच आधारे एआयच्या मदतीनं हा राज्याभिषेक सोहळ्याचा व्हिडीओ तयार करण्यात आलाय.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३० मे १६७४ रोजी सुरुवात झाली आणि ६ जून १६७४ रोजी संपन्न झाला असं हेन्रीने त्याच्या डायरीत नमूद केलंय. या आठवड्याभराच्या कालावधीत अनेक विधी आणि कार्यक्रम रायगडावर पार पडले. रायगडावर मोठ्या उत्साहात लोक या सोहळ्यात सहभागी झाले होते. आठ दिवसात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात ग्रहयज्ञ, नक्षत्रहोम इत्यादी विधीही पार पडले.
राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्ट आले होते. काही इंग्रज अधिकारीही राज्याभिषेक सोहळ्यावेळी राजदरबारात उपस्थित होते. ५ आणि ६ जून रोजी राज्याभिषेकाचे मुख्य विधी पार पडले होते. रायगडावर दऱ्याखोऱ्यातून लोक राज्याभिषेक सोहळ्यासाठी येत असल्याचं या व्हिडीओत दिसतं.
अबालवृद्धांसह लोक गडाच्या पायऱ्या चढत आहेत. राजदरबारात लोकांनी गर्दी केलीय. गडावर गोड पदार्थ तयार करण्यात आलेत. इंग्रज अधिकारी आणि इतर लोक राजांच्या राज्याभिषेकासाठी आलेत. सजवलेले हत्तीही मिरवणुकीसाठी सज्ज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज दरबारात सिंहासनावर बसण्यासाठी जात असल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलंय. राज्याभिषेकानंतर मेघडंबरीतील सिंहासनावर ते बसल्याच्या दृश्याने शेवट करण्यात आलाय.