सासवड शहर, ता. ५ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड (ता. पुरंदर) येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र पदविका महाविद्यालयाने फार्मसी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेत सातारा फार्मसी महाविद्यालयाची सुप्रिया मुळीक हिने प्रथम क्रमांक पटकावला.
डिझास्टर मेडिसिन या विषयावर आयोजित केलेल्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना उपलब्ध आकर्षक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील ज्ञानाचे मूल्यांकन करणे, तसेच स्पर्धात्मक वातावरण देऊन, प्रश्नमंजूषा गंभीर विचारसरणी, सक्रिय सहभाग आणि ज्ञान संपादनास प्रोत्साहन देत आपत्तीविषयाची सखोल समज वाढवणे, हे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव, बुलडाणा, नाशिक आणि नागपूर या ठिकाणाहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेमध्ये सुप्रिया मुळीक (गौरीशंकर एज्युकेशन कॉलेज ऑफ फार्मसी सातारा) हिने प्रथम क्रमांक, ऋतुजा काळे हिने द्वितीय व ऋतुजा घालमे (परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसी काष्टी) हिने तृतीय क्रमांक पटकवला. त्यांना रोख बक्षीसे आणि इ-प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच, स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना इ-प्रमाणपत्र दिले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी महाविद्यालयाच्या पदविका विभाग प्रमुख प्रा. विशाखा गायकवाड आणि त्यांच्या सहकारी प्रा. सुनीता बाठे यांनी पार पाडली.