मोखाडा : मोखाडा तालुक्याला शुक्रवारी 4 एप्रिल ला अवकळी वादळी पावसाने झोडपले होते. या वादळी पावसाने मोखाड्यातील खोडाळा भागातील अनेक गावपाड्यांतील घरांचे, फळबागा तसेच फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तातडीने आमदार हरिश्चंद्र भोये यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान ग्रस्तांना दिलासा दिला आहे. तसेच नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मोखाड्यात झालेल्या अवकळी वादळी पावसाने गोमघर, वाशिंद, दुधगाव, सुर्यमाळ, भवानीचीवाडी, जोगलवाडी, राजेवाडी या गावांसह अन्य गावपाड्यांमधील घरांची पडझड झाली आहे. येथील कुटुंबांचे संसार ऊघड्यावर आले आहेत. त्यांच्या घरातील धन धान्याची मोठी नुकसान झाली आहे. अनेक घरातील संसारोपयोगी साहित्य भिजले आहे. तसेच आंबा, काजु फळबागांचे मोठे नुकसान झाले असून फुलशेतीची ही हानी झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब कोसळुन विजपुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मोखाड्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच या विभागाचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी गोमघर, दुधगाव आणि वाशिंद या भागाचा दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी नुकसान ग्रस्तांनी डोळ्यात अश्रु आणत आपल्या व्यथा आमदारांकडे मांडल्या. आमदार हरिश्चंद्र भोये यांनी नुकसान भरपाई मिळण्याबाबत आश्वासन देत त्यांना दिलासा दिला आहे. तसेच नुकसानीची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तर नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केल्याची माहिती तहसीलदार मयुर खेंगले यांनी दिली आहे.
यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या सोबत भाजप जिल्हा चिटणीस विठ्ठल चोथे, खोडाळा ग्रामपंचायतीचे ऊपसरपंच ऊमेश येलमामे, भाजप आदिवासी आघाडी पालघर जिल्ह्याध्यक्ष मिलिंद झोले, गोमघर च्या सरपंच सुलोचना गारे, सावर्डे ग्रामपंचायतीचे ऊपसरपंच हनुमंत पादीर, अनिल येलमामे, यांसह भाजपचे पदाधिकारी आणि महसुल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
मोखाड्यातील वादळी पावसाच्या नुकसानीची माहिती मिळताच या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या असुन नुकसान ग्रस्तांचे पंचनामे देखील सुरु केले आहेत. ऊधा जिल्हाधिकार्यांची भेट घेणार असुन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या भागाला निधी ऊपलब्ध करून देण्यासाठी आग्रही मागणी करणार आहे.
हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड विधानसभा