गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com
“माझ्या फांद्या बघ. त्या जाड आहेत आणि बारीकही आहेत, लांब आहेत आणि छोट्याही आहेत. या सगळ्यांनी मिळून मला मजबूत बनवलं आहे.” सुन्नूचं झाड दिचीच्या कानात कुजबुजलं. काय? दिची आणि झाडं एकमेकांशी बोलत असत? मग मी सांगतेय काय! खरंच! बरं, पण आधी दिची आणि तिच्या गावाची ओळख तर करून देते.
दिचीचं गाव म्हणजे हिमालय पर्वतरांगेतलं एक छोटं गाव. एकदा दिची तिच्या आवडत्या झाडाच्या उंच फांदीवर बसून ढोलकं वाजवत असतानाच तिच्या वडिलांची म्हणजे दादांची हाक तिला ऐकू आली. दिचीची आजी आजारी होती. त्यामुळे तिला मदत करायला म्हणून दिची नदी ओलांडून आजीच्या घरी जाणार होती. त्यासाठी ते तिला बोलावत होते. दादा, दिची आणि दादांचं खेचर असे सगळे नदीतून दुसऱ्या काठावर जाऊ लागले. नदीतल्या दगडांवरून कसरत करत जाताना दिची पाय घसरून पडली. अचानक नदीत पाण्याचा एक मोठा लोंढा आला आणि नदी तुडुंब भरून वाहू लागली. दिची पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याचं बघून जवळच मासे पकडणारे तिचे काका धावत आले. त्यांनी दिचीला पकडलं आणि ते तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले, पण पाण्यामुळे गडगडत आलेल्या एका खडकाखाली तिचा डावा पाय अडकला होता. मोठ्या प्रयत्नाने, ताकद लावून काकांनी तिला बाहेर काढलं. दिचीची नजर तिच्या वडिलांना-दादांना शोधत होती, पण दादा दिसलेच नाहीत. काही दिवसांनी दिसलं, ते त्यांच पुरात वाहून गेलेलं त्यांचं मृत शरीर. या सगळ्या घटनांचा दिचीच्या मनावर खूप खोल परिणाम झाला.
या धक्क्यातून सावरत आपली शक्ती गमावलेल्या डाव्या पायासोबत, आधारासाठी घेतलेल्या कुबड्यांसोबत दिचीने हळू हळू नव्या आयुष्याची सुरुवात केली. दिची तिच्या आवडत्या सुन्नू झाडावर चढून बसायची. झाडाच्या खाली, त्याच झाडापासून तयार केलेल्या तिच्या कुबड्या असायच्या. दिची पक्षांच्या घरट्यात डोकावून बघायची आणि मग त्यांच्या गप्पा होत.
एकदा ती झाडाला सांगत होती, ‘तू माझं झाड आहेस. काकाने सांगितलंय मी अगदी तुझ्यासारखी आहे.’ तेवढ्यात श्यामने तिला आवाज देऊन सभेसाठी गावकरी जमताहेत असं सांगितलं. दिची झाडावरून उतरून श्यामच्या मागोमाग सभेच्या जागी पोहोचली. गावची मुखिया- गौरी दीदी सगळ्यांशी बोलत होती. चांद नावाचा कंपनीचा ठेकेदार त्याची माणसं घेऊन गावचा जीव की प्राण असलेली देवदार, पाईन, चिड, सुन्नू इत्यादी झाडं तोडण्यासाठी येणार होता. त्यांना विरोध करण्यासाठी आपण आपल्या या झाडांना मिठी मारून बसू असं तिचं म्हणणं होतं. तिच्या सांगण्यात कळकळ होती. आवाहन होतं. या शांततापूर्ण, अहिंसक मार्गाने होणाऱ्या ‘चिपको आंदोलनात’ मग सगळे जण सहभागी झाले आणि घोषणा देत रानाकडे चालू लागले.
दिची आणि तिचे मित्रही मोठ्यांच्या बरोबरीने घोषणा देत होते.
जंगल देते कुठला मेवा?
माती, पाणी, शुद्ध हवा!
पण गणवेश घातलेल्या काही माणसांचा जमाव तिथे आधीच येऊन पोहोचला होता. तोडण्यात येणाऱ्या झाडांवर ‘फुल्यांच्या’ खुणा करायची सूचना चांद त्या माणसांना देत होता. हे पाहताच गावकऱ्यांनी त्यांना घेरलं आणि ते आणखी जोशाने ढोलकी वाजवत घोषणा देऊ लागले. गावकऱ्यांचा हा एकूण अंदाज बघून चांद ठेकेदाराने एक छद्मी हास्य केलं आणि तो त्याच्या माणसांबरोबर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी एक अजबच गोष्ट घडली. सरकारने गावात ट्रक पाठवले होते लोकांना न्यायला. काय तर म्हणे, डोंगरापलीकडच्या गावात सिनेमा दाखवणार होते. आता क्वचितच मिळणारी ती संधी कोण सोडेल? सगळी पुरुष मंडळी ट्रकमध्ये बसून सिनेमा बघायला गेली. बायकांची रोजची कामं आणि मुलांच्या शाळा यामुळे ती गावातच होती. त्या दिवशीची शाळा संपली तशी दिची आणि तिची भावंडं मेंढ्यांना घेऊन रानात गेली. दिची रानातच जरा वेळ रेंगाळली. तिच्या आवडत्या सुन्नूच्या झाडावर थोडी रेलली. त्याची मऊमऊ पानं तिला गुदगुल्या करत होते. झाडाच्या सालाचा थंडगार स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. त्यांचं हितगुज सुरू झालं होतं. झाडावर निश्चिंतपणे पहुडलेली दिची, झाडाविषयी तिच्या डोळ्यात असलेलं प्रेम जयंती मनोकरण यांच्या सुंदर चित्रांकनातून आपल्याला दिसतं. ही गोष्टसुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे. याचा मराठी अनुवाद केलाय मृणालिनी वानरसे यांनी. ‘प्रथम बुक्स’ने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
बराच वेळ दिची अशी झाडाला कवेत घेऊन, मिळणारा थंडावा अनुभवत होती, पण अचानक ही शांतता भंगली. दचकून जाग यावी तशी सगळी झाडं आणि झाडाभोवतीचे जीव घाबरेघुबरे झाले. कारण करकचून लावलेल्या ‘ब्रेक्स’चा कर्कश आवाज झाला होता. दिचीने पानाआडून पाहिलं की, एका चिखलाने माखलेल्या बसमधून, तळपत्या कुऱ्हाडी हातात घेऊन गणवेश घातलेली माणसं ओळीने बाहेर पडत होती. दिचीचा श्वास अडकल्यासारखा झाला. तिला आता सारं काही कळून चुकलं होतं. ती भरभर झाडावरून खाली उतरली, डोंगर उतारावरून मोठ्या प्रयत्नाने ती खाली उतरू लागली. कुबड्यांचा आधार घेत, कष्टाने, शक्य तितक्या वेगाने ती घरी पोहोचली. अतिश्रमाने दमलेल्या दिचीने धापा टाकतच आईला सगळी हकीकत सांगितली. दिची आणि तिच्या आईने तातडीने गावातल्या सगळ्या स्त्रियांना आणि मुलांना गोळा केलं - त्यात गावची मुख्य गौरी दीदी पण होती. सगळे आपल्या लाडक्या झाडांच्या संरक्षणासाठी रानाकडे निघाले. अर्थात हिंसा नं करता त्यांना धडा शिकवायचे असं गौरी दीदीने सांगितल्याचं त्यांच्या लक्षात होतं.
“चिपको ऽऽऽऽ” खुणा असलेल्या झाडाला प्रत्येकाने जाऊन घट्ट मिठी मारली.
“तुम्ही माझं झाड कापू शकत नाही” दिची त्वेषाने म्हणाली.
चांद ठेकेदाराने या जंगलातून कसं टिकावू लाकूड मिळतं, राळ मिळते, परदेशी चलन मिळतं ते सांगितलं. त्यावर दिची काकुळतीनं म्हणाली, “पण ही झाडं आमचं सर्वस्व आहेत.” मोठ्या प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीमुळे काही वर्षांपूर्वी नदीला आलेल्या पुरात दिचीने आपले वडील गमावले आहेत हे कळताच एका गणवेशधारी माणसाच्या हातून कुऱ्हाड गळून पडली. मग दुसऱ्याच्या. मग तिसऱ्याच्या. अशा एकामागून एक कुऱ्हाडी पडतच राहिल्या. रागाने मूठ आवळण्याशिवाय चांद ठेकेदारकडे काही पर्याय उरला नाही. तो पाय आपटत तिथून निघून गेला.
हुर्रे! सगळ्यांनी जल्लोष केला! सुन्नूसुद्धा आनंदून गेलं होतं. आता त्याच्यात आणि दिचीमधे काय बोलणं झालं हे जाणून घ्यायचं असेल, तर मग पुस्तकच वाचायला हवं. झाडं तर आपल्याला आजवर सगळं काही निःस्वार्थीपणे देत आली आहेत. आज त्यांना आपली गरज आहे. फक्त एक मिठी मारून आपण कोणाला तुटण्यापासून किंवा तोडले जाण्यापासून वाचवू शकत असू, तर अशी एक छोटी कृती करायला काय हरकत आहे! मग ती झाडांसाठी असो किंवा माणसांसाठी?