द्वारका : पायी तीर्थयात्रा करण्याची भारतीयांची परंपरा उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र व रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांनीही जपली आहे. अंबानी कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या जामनगर पासून द्वारकेपर्यंतचे १७० किलोमीटरचे अंतर त्यांनी चालत पूर्ण केले. अनंत अंबानी यांनी द्वारकाधीशाचे दर्शन घेत आपली पदयात्रा नियोजनापेक्षा दोन दिवस आधीच पूर्ण केली. अनंत अंबानी यांची पदयात्रा म्हणजे धार्मिक तीर्थाटन, जिद्द आणि श्रद्धेचा अनोखा संगम होता, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
रामनवमीनिमित्त द्वारका येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील वातावरण भक्तीमय होते. या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी हे आज द्वारकाधीश मंदिरात पोहोचले. यावेळी अनंत अंबानी यांच्या मातु:श्री आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची पत्नी राधिका मर्चंट त्यांच्याबरोबर होते. अनंत अंबानी म्हणाले, ‘‘ही माझी धार्मिक पदयात्रा असून त्याची सुरुवात ईश्वराच्या नावाने केली आणि त्याचा शेवटही त्याच्याच नावाने करत आहे. भगवान द्वारकाधीश यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. या पदयात्रेत सहभागी झालेल्या जनतेचे आभार मानतो.’’ जेव्हा मी माझ्या वडिलांना पदयात्रेबाबत सांगितले तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहित केले, असेही अनंत यांनी सांगितले.
अनंत अंबानी २९ वर्षांचे आहेत. या पदयात्रेत कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता त्यांनी सद्भावनेने यात्रा पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. अनंत अंबानी यांनी वैयक्तिक आरोग्याच्या आव्हानावर मात करत अतिशय संयमाने पदयात्रेचा संकल्प पूर्णत्वास नेला.
पदयात्रा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता तर तो शिस्तबद्ध जीवन जगण्याचा मार्ग होता. जगाचे कौतुक मिळवण्यासाठी नाही, जगावर छाप पाडण्यासाठी नाही, तर मन:शांतीसाठी आणि ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला. ईश्वराप्रती, जनतेप्रती मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेदना, त्रास सहन करेन. मी नतमस्तक होण्यास तयार आहे, कारण मी अहंकाराऐवजी त्यागवृत्ती स्वीकारली आहे.
- अनंत अंबानी