मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात तगडा संघ मानला जातो. पण मागच्या काही वर्षात दिग्गज खेळाडूंचा भरणा असून नजर लागली आहे. मुंबई इंडियन्सची सुरुवातच पराभवाने होत आहे. आता खेळलेल्या पाच सामन्यापैकी चार सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पुढचा प्रवास आणखी किचकट होत चालला आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकचा सामन्यात विजय मिळवून 2 गुणांची कमाई केली आहे. प्लेऑफच्या दृष्टीने आता 9 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं गणित कट टू कट आलं आहे. दोन पराभव आणखी झाले तर प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा विसंगत फॉर्म, फिरकी गोलंदाजांचा अभाव आणि मधल्या फळीवरील दबाव हे सर्व घटक कारणीभूत आहेत. मुंबई इंडियन्सला दुसऱ्या टप्प्यातही कठीण प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.नेमकं मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित कसं आणि पुढे काय ते जाणून घ्या…
प्लेऑफच्या चार संघात जागा मिळवायची तर 16 गुणांची आवश्यकता असते. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 सामने खेळले असून 9 सामने शिल्लक आहेत. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला 16 गुण करायचे तर 9 पैकी 7 सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. कमी गुणांसह पात्रता फेरी गाठण्याची संधी आहे. पण ते नेट रन रेट आणि इतर संघाच्या जय पराजयाच्या निकालांवर अवलंबून असेल.मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांतून 2 गुण मिळवले आहेत. तसेच गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पण नेट रन रेट – 0.010 वर आहे. त्यामुळे विजयासोबत नेट रनरेट सुधारणं तितकंच आवश्यक आहे. 14 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे हे इतर संघांच्या पराभवावर आणि त्यांच्या नेट रन रेटवर अवलंबून असेल. पण मुंबई इंडियन्सने 16 गुणांचे लक्ष्य ठेवणे हे सुरक्षित असेल.
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादशी मुंबई इंडियन्सचे प्रत्येकी दोन सामने होणार आहे. तर उर्वरित पाच पैकी प्र्त्येकी एक सामना हा चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सशी होणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला या संघांना पराभूत करावं लागणार आहे.