अखेर काकोळे रेल्वे धरणाला मिळाला हक्काचा सन्मान
esakal April 18, 2025 05:45 AM

उल्हासनगर, ता. १७ (बातमीदार) : भारतीय रेल्वेच्या इतिहासात मोलाचे योगदान असलेल्या पण अनेक दशकांपासून उपेक्षित राहिलेल्या काकोळे रेल्वे धरणाला अखेर त्याचा हक्काचा सन्मान मिळाला आहे. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या काकोळे गावातील ऐतिहासिक रेल्वे धरणावर ‘द ग्रेट इंडियन पेनिन्सुला - काकोळे’ असा फलक बुधवारी (ता. १६) रेल्वे दिनानिमित्त झळकवण्यात आला. ही घटना म्हणजे १७२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इतिहासाला मिळालेली ओळख आहे. हा क्षण अंबरनाथ आणि उल्हासनगर; तसेच इतर आजूबाजूच्या परिसरासाठी अभिमानाचा ठरला आहे.
१६ एप्रिल १८५३ मध्ये भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे धावली होती. या रेल्वेमध्ये जवळपास ४०० लोकांनी प्रवास केला होता. ‘द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोळशावरील ट्रेनसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा हा काकोळे गावाजवळील या धरणातून करण्यात येत होता. इतकी महत्त्वाची भूमिका बजावणारा हा धरण आजवर विस्मरणात गेला होता. बुधवारी झळकलेला फलक हे केवळ एका पाटीचे अनावरण नसून, भारतीय रेल्वेच्या सुरुवातीच्या पर्वाला केलेले एक प्रतीकात्मक नमन आहे. या ऐतिहासिक दुव्याला शोधणाऱ्या आणि सातत्याने अभ्यास करणाऱ्या वालधुनी नदी अभ्यासक शशिकांत दायमा यांनी या डॅमचे ऐतिहासिक महत्त्व उजेडात आणले.

पर्यावरणाशी असलेली नाळ
या डोंगरमाळेतून उगम पावणारी वालधुनी नदी ही या डॅमची आणखी एक वैभवशाली ओळख आहे. ही नदी श्री मलंगगडातून सुरू होऊन उल्हासनगर, शांतीनगर, एमआयडीसी, प्राचीन शिवमंदिर, रेल्वेस्थानक, हिराघाट, काजल पेट्रोलपंपमार्गे वाहत कल्याणच्या खाडीकडे जाते. ३५-४० वर्षांपूर्वी या नदीचे पाणी स्वच्छ आणि नितळ होते; मात्र आता ती कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे गटारगंगेत रूपांतरित झाली आहे.

भविष्यातील दिशा
इतिहास आणि पर्यावरण यांची ही गुंफण लक्षात घेता, काकोळे धरण आणि वालधुनी नदी यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. हा परिसर केवळ ऐतिहासिकदृष्ट्या नव्हे तर पर्यटन आणि अभ्यासासाठीही उपयुक्त ठरू शकतो. रेल्वे दिनानिमित्त झालेल्या या छोट्याशा पावलाने एक मोठा इतिहास जागा केला आहे. आता या ठिकाणाच्या जतनासाठी सर्वांच्या सहभागाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.