पालिकेच्या तिजोरीत ३८२ कोटींचा महसूल
शहरातील पुनर्विकासामुळे नगररचना विभागाचा फायदा
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता करानंतर नगररचना विभाग हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. नवी मुंबई महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३८१ कोटी ९८ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. पालिकेने अर्थसंकल्पांमध्ये ३०५ कोटीचे टार्गेट ठेवले होते. मात्र पालिकेच्या टार्गेट पेक्षा ७७ कोटींचा अधिकचा महसूल नगरविकास विभागाने जमा केला आहे. तसेच शहरातील शहरातील पुनर्विकासामुळे नगररचना विभागाचा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ३० ते ४० वर्षे जुन्या झालेल्या इमारतींचा आता पुनर्विकास होऊ लागला आहे. पुनर्विकासाला चालना मिळू लागल्यामुळे आता पालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा होऊ लागला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाकडून इमारतींना बांधकाम प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, सुधारित बांधकाम परवानगी, प्रदूषण करणाऱ्या बांधकांमावर दंडात्मक शुल्क यामधून सर्वाधिक महसूल मिळू लागला आहे. सद्यःस्थितीत नवी मुंबईत नव्याने होणाऱ्या बांधकामांमुळे तसेच पुनर्विकासामुळे नवी मुंबईत बांधकाम व्यवसायाला चालना मिळू लागली आहे, तर आता पालिकेने या पुनर्विकासांच्या प्रोत्साहनांसाठी मार्गदर्शन शिबिरदेखील घेण्याचे ठरवले आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडू लागली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये नगररचना संचालक सोमनाथ केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने ३८१ कोटी ९८ लाखांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
.....................
चौकट
२०२२-२३ मध्ये पालिकेला २६६ कोटी ८१ लाखांचा महसूल नगरररचना विभागाला मिळाला होता, तर २०२३-२४ मध्ये ३०४ कोटी २४ लाखांचा महसूल प्राप्त झाला ,मात्र नवीन धोरणांमुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३८१ कोटींचा असा सर्वाधिक महसूल मिळाला आहे. पालिकेच्या तिजोरीत दरवर्षी या महसुलात कोटीची उड्डाणे होत आहेत. शहरातील पुनर्विकास प्रकल्पांमुळे पालिकेच्या उत्पन्नातदेखील सातत्याने वाढ होईल, असा विश्वास नगररचना विभागाने व्यक्त केला आहे.
...................
नवी मुंबई महापालिकेने २०२३-२४ मध्ये ३०४ कोटी २४ लाखांचा महसूल प्राप्त केला होता. पण यंदाच्या आर्थिक वर्षात ३८१.९८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. नवी मुंबईत होणाऱ्या पुनर्विकासामुळे आणखी यामध्ये वाढ होईल.
-सोमनाथ केकाण, सहाय्यक नगररचना संचालक, नवी मुंबई महापालिका