छत्रपती संभाजीनगर : ‘‘सध्या औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जात आहे. परंतु, औरंगजेबासारखे शासक आपले हिरो होऊ शकत नाहीत’’, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (ता. १८) छत्रपती संभाजीनगर शहरात केले. कॅनॉट गार्डन येथे उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते शहरात आले होते.
महापालिका, वीर शिरोमणी प्रताप स्मारक समिती आणि राजपूत समाज मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम झाला. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार रावल, मेवाड नरेश महाराणा प्रताप यांचे वंशज लक्षराज सिंह, पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर, प्रदीप जैस्वाल, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती.
मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज या शूरवीरांचा इतिहास, त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला सांगायला हवे. औरंगजेबासारखा शासक आपला हिरो होऊ शकत नाही’’, असे सांगत त्यांनी शहर नामांतराच्या विषयालाही हात घातला. यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री शिरसाट, मंत्री सावे, लक्षराज सिंह यांनीही विचार व्यक्त केले.
हा पुतळा प्रेरणास्रोत ः फडणवीसछत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. दुसरीकडे महाराणा प्रताप यांचा पुतळा आहे. दोन्ही केवळ पुतळे नसून, ते प्रेरणास्रोत आहेत. या महापुरुषांच्या मार्गावर चालायचा निर्धार आपण करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.