राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासंदर्भातील चर्चांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. हो दोघेही एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी चांगलीच बाब आहे, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केलीय. तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार नाहीत, असे भाकित शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलंय. असं असतानाच आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिलीय. या युतीसंदर्भात विचारताच एकनाथ शिंदे चांगलेच भडकले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरेगाव या मूळ गावी आहेत.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आमच्या दोघांची भांडणं खूप लहान आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे सूचक विधान करत भविष्यात आम्ही एकत्र येऊ शकते, असे सूतोवाच केले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वागत केले आहे. राज ठाकरेंच्या विधानाकडे आम्ही सकारात्मकतेने पाहतोय. याकडे दुर्लक्ष करण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलीय.
तर उद्धव ठाकरे यांनीदेखील माझ्याकडून कधी भांडण नव्हतंच. मी छोटीमोठी भांडणं विसारयला तयार आहे, असे म्हणत युतीच्या चर्चेसाठी दारं खुली आहेत, असंच एकाप्रकारे सांगितलं आहे. सोबतच युती करायची असेल तर महाराष्ट्रद्रोह्यांना जेवणाला बोलवायचं नाही, त्यांच्यासोबत जेवायला जायचं नाही, त्यांचा प्रचार करायचा नाही, अशा अटी उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या आहेत. याच कारणामुळे आता मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना एकनाथ शिंदे चांगलेच भडकले. “तू कामाचं बोल. तुम्हाला दुसरं काही दिसतच नाही. राजकारण आहे की रोजचंच,” असं एकनाथ शिंदे संतापून म्हणाले आहेत.