बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. या गावांमधील नागरिकांची केस गळती होऊन टक्कल पडल्याचा प्रकार ३ महिन्यांपासून सुरू आहे. आधी केस गळती आणि आता बोटांची नखं चालल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे. आधी टक्कल व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली होती पण आता बोटांची नखं जायला लागल्यामुळे नागरिक संकटामध्ये आले आहेत. नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या गावकऱ्यांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील केस गळती प्रकरण ताजे असतानाच आता बोंडगावमध्ये केस गळतीनंतर नागरिकांच्या बोटांची नखं ही चालली आहेत. यामुळे या गावातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिने झाले तरी देखील केस गळतीसंदर्भात आयसीएमआरचा अहवाल आला नाही. फक्त बोंडगावच नाही तर या गावाच्या आसपासच्या परिसरातील इतर गावांमधील नागरिकांच्या बोटांची देखील नखं चालली आहेत. बोटांची नखं गळून पडत असल्यामुळे नागरिक भयभीत झालेत.
बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्यामुळे अनेकांचे टक्कल पडले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच टक्कल पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. बुलढाण्यातील प्रकरणातील पाण्याचा अहवाल समोर आला होता. हे पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली होती. बोंडगाव आणि खातखेडमध्ये ७० पेक्षा अधिक नागरिकांचे केस जाऊन टक्कल पडले. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. साधारणता पाण्यात नायट्रेटचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत असायला पाहिजे. पण याठिकाणच्या पाण्याच्या तपासणी अहवालातून ५४ टक्के नायट्रेटचे प्रमाण असल्याचे समोर आले होते.
बुलढाण्यातील या गावांमध्ये येणाऱ्या पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तसेच पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली आहे. त्यामुळे पाणी विषारी झाल्याची माहिती समोर आली. तसेच पाण्यात क्षाराचे प्रमाण ११० पर्यंत असायला हवे होते त्याचे प्रमाणे २१०० पर्यंत आढळून आले आहे.गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरत आहे. केस गळती होत असताना आता नखं देखील गळून पडायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.